कार्यकर्ता शिस्तीसाठी भाजपचे महाप्रशिक्षण
By Admin | Updated: August 5, 2015 02:56 IST2015-08-05T02:56:00+5:302015-08-05T02:56:00+5:30
गेली अनेक वर्षे भाजप विरोधी पक्षात राहिल्यामुळे अजूनही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सत्तेचा सूर गवसलेला नाही.

कार्यकर्ता शिस्तीसाठी भाजपचे महाप्रशिक्षण
मंडळनिहाय होणार वर्ग : काय बोलावे, काय बोलू नये ते सांगणार
नागपूर : गेली अनेक वर्षे भाजप विरोधी पक्षात राहिल्यामुळे अजूनही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सत्तेचा सूर गवसलेला नाही. बहुतांश कार्यकर्ते अजूनही सरकारविरोधी भूमिका घेताना दिसतात. तसे भाष्य करतात. अशा सर्व कार्यकर्त्यांना आता भाजप सत्तेत असल्याची जाणीव करून देण्यासाठी तसेच काय बोलावे, काय बोलू नये, कसे वागावे हे समजावून सांगण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी भाजपतर्फे राज्यभर पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान राबविण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात पक्षाचे आमदार, पदाधिकारी, महाप्रशिक्षण कार्यक्रमासाठी नेमण्यात आलेले प्रमुख, सहप्रमुख, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी ६ व ७ आॅगस्ट रोजी मुंबईत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. हे निवासी प्रशिक्षण असेल. येथे प्रशिक्षण घेतलेले पदाधिकारी नंतर आपापल्या शहरात प्रशिक्षण वर्ग घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांना भाजपच्या ध्येयधोरणांची माहिती देतील. नागपुरात महिनाभरात ४ ते ५ प्रशिक्षण वर्ग होतील. यासाठी संघटन सचिव श्रीकांत देशपांडे, व सरचिटणीस प्रमोद पेंडके यांना प्रमुख करण्यात आले आहे. देवेंद्र दस्तुरे सहप्रमुख आहेत. महिला प्रमुख म्हणून नीलिमा बावणे, कार्यक्रम प्रमुख चेतना टांक, प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी, आयटी प्रमुख केतन मोहितकर, वाहतूक प्रमुख म्हणून संजय वाधवानी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभानिहाय पालकही नेमण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
मंडळस्तरावर मायक्रोप्लॅनिंग
भाजपमध्ये शेवटच्या टोकावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी मंडळस्तरावर मायक्रोप्लॅनिंग करण्यात आले आहे. मंडळ स्तराव कुणाला प्रशिक्षण द्यायचे, स्थानिक कोणते विषय घ्यायचे आदींची यादी तयार करण्यात आली आहे.
मनपा व जि.प. निवडणुकीची तयारी
भाजपने राज्यात सदस्य नोंदणीत मुसंडी मारली. यात नागपूर शहर व जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. आता महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून या सदस्यांपर्यंत पोहचण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. अशात जनसंपर्कासाठी बाहेर पडणारा कार्यकर्ता प्रशिक्षित असेल, पक्षाच्या ध्येयधोरणांबद्दल स्पष्टता असलेला असेल तर तो प्रभावीपणे पक्षाची बाजू मांडेल. दीड वर्षांनी महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक आहेत. जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचून अप्रत्यपक्षणे निवडणुकीची तयारी करण्याची रणनीतीही भाजपने आखली आहे. सत्ताप्राप्तीनंतर कार्यकर्ते काहिसे सुस्त होतात. अशात संघटनेकडे दुर्लक्ष होते. हे प्रकार टाळण्यासाठी व कार्यकर्त्यांना बिझी ठेवणे हा देखील महाप्रशिक्षणामागील हेतू आहे.