वाडीत बसपाने रोखली भाजपची गाडी

By Admin | Updated: April 24, 2015 02:12 IST2015-04-24T02:12:19+5:302015-04-24T02:12:19+5:30

पूर्ण शक्ती पणाला लावूनही नागपूरच्या सीमेवर असलेल्या वाडी नगर परिषदेत भाजपची गाडी बहुमतापर्यंत जाता जाता मध्येच बसपाने अडवली.

The BJP's car stopped by the BSP | वाडीत बसपाने रोखली भाजपची गाडी

वाडीत बसपाने रोखली भाजपची गाडी

नागपूर : पूर्ण शक्ती पणाला लावूनही नागपूरच्या सीमेवर असलेल्या वाडी नगर परिषदेत भाजपची गाडी बहुमतापर्यंत जाता जाता मध्येच बसपाने अडवली. मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेशी युती करून अपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजपने केला असला तरी संख्याबळाचा विचार करता अपक्षांच्या हातीच सत्तेची चाबी राहणार आहे तर दुसरीकडे आजवर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या मोवाड नगर परिषदेत बहुमत मिळविण्यात भाजपला यश आले असले तरी अध्यक्षपद मात्र ईश्वरचिठ्ठीने राष्ट्रवादीच्या झोळीत आले. कामठी येथील पोटनिवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचने भाजपच्या मदतीने काँग्रेसकडून जागा हिसकावली. या निवडणुकीमुळे जिल्ह्यात भाजपची लाट अद्याप ओसरली नसल्याचे तर काँग्रेसची हवा पूर्णपणे गोल झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का
वाडी ग्रामपंचायत यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत २५ जागांपैकी केवळ चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. ७ जागांवर बसपाने मुसंडी मारली. तेथील वॉर्ड क्र. १२ आणि २० ते २५ या सात जागांवर दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला बसपाने विजयी मतांजवळ फिरकूसुद्धा दिले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह दिग्गजांनी प्रचारसभा घेतल्या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कार्यकर्त्यांना ‘ऊर्जा’ दिली. मात्र, त्यानंतर भाजपला २५ पैकी फक्त १० जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे बसपाने तब्बल ७ जागा जिंकत भाजपचा विजयरथ अडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेनेला दोन जागा राष्ट्रवादीला ४ जागा जिंकण्यात यश आले. अपक्षाने एक जागा जिंकली. आता भाजप सेना एकत्र आले तरी १२ जागा होतात व राष्ट्रवादी-बसपा- काँग्रेस एकत्र आले तरी १२ जागाच होतात. त्यामुळे येथे अपक्ष उमेदवारावर सर्वकाही अवलंबून आहे. वाडीत शिवसेना व अपक्षाच्या मदतीने भाजपचाच झेंडा फडकेल, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केला आहे.
मोवाडमध्ये राष्ट्रवादीला अपयश आले. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या १० वर्षांपासून सत्ता होती. मात्र या निवडणुकीत भाजप-सेना युतीने बाजी मारली. १७ सदस्यांच्या या नगरपरिषदेत भाजपला ९ तर शिवसेनेला २ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला ५ तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. येथील अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला संवर्गासाठी राखीव होते. या जागेसाठी वॉर्ड क्र. १६ मध्ये राष्ट्रवादीच्या रंजना सोळंके व शिवसेनेच्या मंगला गजबे यांच्यात लढत झाली. दोन्ही उमेदवारांना १४७ एवढी सारखी मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. ईश्वरचिठ्ठीत राष्ट्रवादीच्या रंजना सोळंके यांचा विजय झाला. त्यामुळे भाजप-सेना युतीला बहुमत मिळूनही अध्यक्षपद मात्र राष्ट्रवादी भूषविणार आहे.
कामठी नगर परिषदेच्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे संजय खोब्रागडे यांनी १६८९ मते घेतली. त्यांनी काँग्रेसचे प्रशांत मानवटकर (१३०८) यांचा पराभव केला. (प्रतिनिधी)

Web Title: The BJP's car stopped by the BSP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.