नागपूर : मार्च महिन्यात पेटल्यानंतर आता शांतता प्रस्थापित झालेल्या महालातील शिवाजी पुतळा चौकात सोमवारी परत तणाव पहायला मिळाला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून कॉंग्रेसविरोधात आंदोलन केले. मात्र आंदोलनादरम्यान पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता कॉंग्रेसच्या देवडिया भवन येथील कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. शिवाय कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळादेखील जाळला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.ईडीने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेसच्या नेत्यांची नावे चार्जशीटमध्ये नमूद केली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अमित मोरे यांच्या नेतृत्वात शिवाजी पुतळा चौकात भाजयुमोचे कार्यकर्ते एकत्रित आले. कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. काही कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळादेखील जाळला. मात्र अचानक कार्यकर्ते कॉंग्रेसच्या देवडिया भवन येथील कार्यालयाकडे जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना तेथे जाण्यास मनाई केली. मात्र तरीदेखील कार्यकर्ते चिटणीस पार्क चौकापर्यंत पोहोचले. मात्र त्यानंतर देवडिया भवनापासून ५० मीटर अंतरावर ते स्वत:हून थांबले. भाजयुमो शहराध्यक्ष बादल राऊत, शिवानी दाणी हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते.
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
By योगेश पांडे | Updated: April 22, 2025 02:36 IST