आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST2021-07-07T04:10:14+5:302021-07-07T04:10:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाल्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी सकाळी उपराजधानीत पक्ष कार्यकर्त्यांतर्फे आंदोलन करण्यात ...

आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाल्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी सकाळी उपराजधानीत पक्ष कार्यकर्त्यांतर्फे आंदोलन करण्यात आले. भाजप व भाजयुमोचे कार्यकर्ते बडकस चौकात झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून विधिमंडळात सरकारने लोकशाहीची हत्या केला असल्याचा आरोप लावण्यात आला.
आंदोलनाला भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार सुधाकर कोहळे, मिलिंद माने, अर्चना डेहनकर, संजय भेंडे, दीपांशू लिंगायत प्रामुख्याने सहभागी झाले होते. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिल्यामुळे सरकारने खोटे आरोप लावत हा प्रकार केला आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. ओबीसी आरक्षण परत मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी राम आम्बुलकर, संजय बंगाले, किशोर पलांदुरकर, भोजराज डुम्बे, मनीष मेश्राम, सुबोध आचार्य, प्रमोद पेंड़के, गुड्डू त्रिवेदी हेदेखील उपस्थित होते.
राज्यपालांनी सरकार बरखास्त करावे
आंदोलनानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यामार्फत राज्यपालांकडे निवेदन सादर केले. महाराष्ट्र शासनाचे वर्तन दडपशाहीचे असून राज्यपालांनी सरकार बरखास्त करावे अशी मागणी यातून करण्यात आली.
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असल्यामुळे शासनाने निर्बंध लावले असले तरी भाजपच्या आंदोलनात मात्र कोरोनासंदर्भातील नियमावलीचा पार फज्जा उडाल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांनी नावापुरतेही फिजिकल डिस्टन्सिंग पाळले नव्हते. इतकेच काय तर अनेक पदाधिकारी मास्कविना सहभागी झाले होते. आश्चर्याची बाब म्हणजे आंदोलनाचे नेतृत्व करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील बराच वेळ मास्क लावला नव्हता.