भाजपच्या दारात जाणार नाही - शिवसेना
By Admin | Updated: January 14, 2017 22:13 IST2017-01-14T22:13:29+5:302017-01-14T22:13:29+5:30
नागपूरात शिवसेना हात जोडत भाजपच्या दारात जाणार नाही. आम्ही स्वत:हून कुठलाही प्रस्ताव देणार नाही. शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपच्या दारात जाणार नाही - शिवसेना
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - नागपूरात शिवसेना हात जोडत भाजपच्या दारात जाणार नाही. आम्ही स्वत:हून कुठलाही प्रस्ताव देणार नाही. शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला कमी लेखू नका. आम्ही तर झेप घेऊच मात्र, आमच्यामुळे त्यांच्या किती जागा पडतात ते भाजपला निकालानंतर दिसून येईल, असे प्रत्युत्तर वजा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांनी भाजपला दिला आहे.
भाजपचे अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी शुक्रवारी भाजप नेते स्वत:हून शिवसेनेकडे चर्चेसाठी जाणार नाहीत. शिवसेनेकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तरच चर्चा होईल. शहरात आपली शक्ती व जनतेचा असणारा पाठिंबा यावर आत्मचिंतन करूनच शिवसेनेचा प्रस्ताव द्यावा, असे रोखठोक मत मांडत शिवसेनेला तिच्या ताकदीची आठवण करून दिली होती. कोहळे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना नेते चांगलेच डिवचल्या गेले आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हरडे यांनी शनिवारी भाजपवर हल्लाबोल केला. हरडे म्हणाले, आम्ही भाजपशी युतीचा विचारच केलेला नाही. त्यामुळे आम्ही प्रस्ताव देण्याचा प्रश्नच येत नाही. आमची स्वबळावर लढण्याची तयारी झाली आहे. शिवसेनेच्या मेळाव्यातही आम्ही तशीच भूमिका मांडली. संपर्क प्रमुखांनीही तसे जाहीर केले. वरच्या पातळीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत काही निर्णय घेतला व तसे आदेश आले तरच आम्ही विचार करू. नाहीतर आम्ही आम्ही एकला चलोचा मार्ग स्वीकारला आहे.
भाजपकडे मोठे असतील पण आमच्या शिवसैनिकांनाही कमी लेखू नका. कडवट शिवसैनिक जिद्दीने उतरता तर भाजपला जागा दाखविल्याशिवाय सोडणार नाही. भाजप पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकू पाहत आहे. यांच्या भूलथापांना आता लोक बळी पडणार नाही. भाजपाचे लोक आमच्या संपर्कात आहेत. निवडणुकीत स्वबळावर लढलो तर नक्कीच भाजपची झोप उडवू, असा इशाराही त्यांनी दिला.
... तर चारचा प्रभाग का केला ?
- शहरात भाजपची ताकद वाढली आहे, असा दावा केला जातो. असे होते तर मग चार सदस्यीय प्रभाग का केला ? भाजपने दोनच्या प्रभागात आपली ताकद का आजमावली नाही ? असा सवाल हरडे यांनी केला. चार नाही सहाचा प्रभाग केला तरी शिवसैनिक भाजपाला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.