भाजपचे टार्गेट पूर्ण, आता संपर्क अभियान !
By Admin | Updated: April 23, 2015 02:35 IST2015-04-23T02:35:22+5:302015-04-23T02:35:22+5:30
भाजपने देशभरात १० कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य निश्चित केले होते. महाराष्ट्राने आपल्या वाट्याचे एक कोटी सदस्य करून टार्गेट पूर्ण केले आहे.

भाजपचे टार्गेट पूर्ण, आता संपर्क अभियान !
नागपूर : भाजपने देशभरात १० कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य निश्चित केले होते. महाराष्ट्राने आपल्या वाट्याचे एक कोटी सदस्य करून टार्गेट पूर्ण केले आहे. आता १ मे पासून पक्षातर्फे ‘संपर्क अभियान’ राबविण्यात येणार असून या अंतर्गत आॅनलाईन नोंदणीत सदस्य झालेल्यांशी प्रत्यक्ष संपर्क केला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दानवे यांनी मंगळवारी नागपुरात येत सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून संपर्क अभियानाचा शुभारंभ केला जाईल. पक्षाचे एक लाख सक्रिय सदस्य झाले आहेत. या सदस्यांना आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यात प्रशिक्षण दिले जाईल. ४ ते ६ मे दरम्यान कोल्हापूर येथे पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे. ५ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्घाटन करतील तर ६ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समारोप करतील. या बैठकीत प्रदेशची नवी कार्यकारिणी जाहीर होईल, असेही त्यांनी सांगितले.
महामंडळ व विविध कमिट्यांवरील नियुक्त्यांबाबत नुकतीच भाजप- सेनेची बैठक झाली. तीत ७०-३० चे प्रमाण ठरले. नगर पालिकेच्या निवडणुका संपताच ३० एप्रिल पूर्वी यावर निर्णय घेतला जाईल. दानवे यांनी यापूर्वीच्या नागपूर भेटीत दुसऱ्या पक्षातील ५ आमदार व २१ माजी आमदार संपर्कात असल्याचे सूतोवाच केले होते याची पत्रकारांनी आठवण करून दिली असता फक्त एक आठवडा वाट पहा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. नवी मुंबई व औरंगाबाद या दोन्ही महापालिकांच्या निवडणुकीत भाजप-सेना युतीचा विजय होईल. औरंगाबादमध्ये एमआयएमचा प्रभाव फक्त ८ ते १० वॉर्डांपुरता मर्यादित आहे. तसाही एमआयएमने भाजपला नुकसान होत नाही, असेही ते म्हणाले. या वेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)