भाजप आमदाराकडून शिवसेना सदस्यांच्या कामाला कात्री
By Admin | Updated: September 10, 2015 03:44 IST2015-09-10T03:44:31+5:302015-09-10T03:44:31+5:30
भाजप-सेनेचे वरवर छान दिसत असले तरी, एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी ते कधीही सोडत नाही.

भाजप आमदाराकडून शिवसेना सदस्यांच्या कामाला कात्री
प्रस्तावच केले नामंजूर : राजकीय आकसाचा फटका
नागपूर : भाजप-सेनेचे वरवर छान दिसत असले तरी, एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी ते कधीही सोडत नाही. नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदार संघात भाजपाच्या आमदाराने शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांवर कुरघोडी करीत त्यांच्या कामाचे प्रस्तावच नामंजूर केले. बुधवारी झालेल्या जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या सदस्यांनी आमदारावरील राग व्यक्त करीत, आमदार राजकीय आकसापोटी आदिवासी क्षेत्रावर अन्याय करीत असल्याचा आरोप केला.
नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत ९.२० कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) पाठविण्यात आला होता. प्रत्येक सर्कलनुसार सदस्यांनी बांधकामाचे प्रस्ताव समितीला दिले होते. मात्र डीपीसीने प्रस्ताव मंजूर करताना जि.प.ला विचारात घेतले नाही. रामटेक तालुक्यातील तीन शिवसेनेच्या सदस्यांचा व काटोल तालुक्यातील माजी उपाध्यक्षांच्या सर्कलच्या बांधकामाचा प्रस्ताव डीपीसीने नामंजूर केला. हे चार प्रस्ताव नामंजूर करून उर्वरित सर्व सदस्यांच्या प्रस्तावाला सरसकट मंजुरी दिली.
प्रस्ताव नामंजूर केलेल्या सदस्यांमध्ये शिवसेनेच्या नगरधन सर्कलच्या सदस्य वर्षा धोपटे, मनसर सर्कलच्या आशा गायकवाड व उमरी सर्कलच्या शोभा झाडे यांचा समावेश आहे.
हे तीनही सर्कल रामटेक विधानसभा क्षेत्रात येतात. डीपीसीने प्रस्ताव नामंजूर करण्यामागचे कुठलेही कारण दिलेले नाही. जिल्हा नियोजन समितीत आमदार सदस्य असल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून राजकीय आकसापोटी आपल्याच मतदार संघातील विकास कामांना खीळ घातली. यासंदर्भात शिवसेनेच्या तीनही सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून आमदारांप्रति आपला राग व्यक्त केला.
हे तीनही सर्कल आदिवासी भागात येत असल्याने, आमदाराने विकास कामांचा प्रस्ताव नामंजूर करून आदिवासी भागावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)