‘रेमडेसिविर’साठी भाजप आमदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:13+5:302021-04-20T04:09:13+5:30
नागपूर : ‘रेमडेसिविर’च्या वाटपात महाविकास आघाडी सरकारकडून विदर्भ व नागपूरवर जाणूनबुजून भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप करीत भाजप ...

‘रेमडेसिविर’साठी भाजप आमदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन
नागपूर : ‘रेमडेसिविर’च्या वाटपात महाविकास आघाडी सरकारकडून विदर्भ व नागपूरवर जाणूनबुजून भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप करीत भाजप खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. ठाणे, मुंबई येथे आवश्यकतेहून जास्त पुरवठा होत असून नागपूरला अत्यल्प पुरवठा का, असा सवाल यावेळी करण्यात आला.
खा. विकास महात्मे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे यांनी हे आंदोलन केले. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी ‘रेमडेसिविर’चा तातडीने पुरवठा व्हावा, ही मागणी केली. नागपुरात आतापर्यंत शासनाकडून दोन रुग्णामागे एक ‘रेमडेसिविर’ पाठविले जायचे. शनिवारी तर एकही ‘इंजेक्शन’ पाठविले नाही. मुंबई, ठाणे येथे एका रुग्णामागे दोन-दोन ‘रेमडेसिविर’ पाठविले जात आहेत. असेच राहिले तर नागपूर व विदर्भातील स्थिती आणखी खराब होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचे निवेदन स्वीकारले.
मनपात आंदोलन का नाही?
मागील तीन ‘टर्म’पासून मनपामध्ये भाजपची सत्ता आहे. मागील पाच वर्षे राज्यात भाजपची सत्ता होती. अशास्थितीत हे आंदोलन मनपा मुख्यालयातदेखील करता आले असते. मात्र तेथे आंदोलन का केले नाही, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत होता.
संचारबंदीत आंदोलन
संचारबंदीदरम्यान अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास जनतेला मनाई करण्यात आली आहे. मात्र ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ न पाळता भाजप नेत्यांकडून आंदोलन कसे काय करण्यात आले, याबाबतदेखील आश्चर्य व्यक्त करण्यात आले.