भाजपाने केला विदर्भाचा विश्वासघात
By Admin | Updated: August 17, 2014 00:48 IST2014-08-17T00:48:47+5:302014-08-17T00:48:47+5:30
भारतीय जनता पार्टी (भाजपा) अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करीत आली असली तरी भाजपाने आजवर विदर्भ विरोधी शिवसेनेला मजबूत करण्याचेच काम केले आहे.

भाजपाने केला विदर्भाचा विश्वासघात
स्वतंत्र विदर्भ परिषद : बसपाचे महासचिव सुरेश माने यांची जाहीर टीका
नागपूर : भारतीय जनता पार्टी (भाजपा) अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करीत आली असली तरी भाजपाने आजवर विदर्भ विरोधी शिवसेनेला मजबूत करण्याचेच काम केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी लिखित आश्वासनसुद्धा दिले होते. परंतु सत्तेत येताच त्यांचे बोलणे बदलले आहे. भाजपाच्या विदर्भातील नेत्यांनीसुद्धा विदर्भ हा काही आमचा अजेंडा नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपाने विदर्भाशी विश्वासघात केला आहे, अशी जाहीर टीका बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय महासचिव व विदर्भ प्रभारी अॅड. सुरेश माने यांनी केली.
बसपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ललित कला भवन इंदोरा येथे स्वतंत्र विदर्भ राज्य परिषद आयोजित करण्यात आली. या वेळी आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे आणि प्रा. रणजित मेश्राम यांच्यासह बसपाचे कृष्णा बेले, किशोर गजभिये, हरीश बेलेकर, विदर्भवादी नेते अहमद कादर, श्रीनिवास खांदेवाले, दीपक निलावार, अॅड. नंदा पराते, सुदीप जैस्वाल यांनीही स्वतंत्र विदर्भाबाबत आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी सागर डबरासे, विश्वास राऊत, विवेक हाडके, पृथ्वीराज गोटे, विनोद पाटील, जितेंद्र घोडेस्वार, महेश सहारे, वृक्षदास बन्सोड, मो. शफी, डॉ. शीतल नाईक, किशोर गजभिये आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)