भाजपाच पहिला शत्रू

By Admin | Updated: January 12, 2017 01:53 IST2017-01-12T01:53:09+5:302017-01-12T01:53:09+5:30

राज्यात शिवसेनेचीही एकहाती सत्ता होती. मात्र, आम्ही सत्ता अंगात आणली नाही. आम्ही भाजपला धाकट्या भावाप्रमाणे वागविले.

BJP is the first enemy | भाजपाच पहिला शत्रू

भाजपाच पहिला शत्रू

शिवसेनेच्या मेळाव्यात हल्लाबोल : स्वबळाचा नारा, १५१ जागा लढणार
नागपूर : राज्यात शिवसेनेचीही एकहाती सत्ता होती. मात्र, आम्ही सत्ता अंगात आणली नाही. आम्ही भाजपला धाकट्या भावाप्रमाणे वागविले. पण यांनी विधानसभा निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसला. याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आपला पहिला शत्रू भाजपा आहे. या शत्रूच्या सामना करण्यासाठी मतभेद विसरून ताकदीने एकत्र या, असे आवाहन शिवसेनेचे नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख आ. तानाजी सावंत यांनी केले. दुपारी महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि सायंकाळी साई सभागृहात आयोजित मेळाव्यात आ. सावंत यांनी पक्षश्रेष्ठी राज्यस्तरावर घेतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगत नागपुरात स्वबळावर संपूर्ण १५१ जागा लढण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख सतीश हरडे, माजी खा. प्रकाश जाधव, माजी आ. आशिष जयस्वाल, शहर प्रमुख मंगेश काशीकर यांनीही भाजपवर तोफ डागली. आ. सावंत म्हणाले, यवतमाळमध्ये संख्याबळ नसताना मी विधान परिषद निवडणुकीचे आव्हान पेलले. आता मी नागपूरचे ‘चॅलेंज’ स्वीकारले आहे. भाजपाजवळ मोठे नेते असतील, पण आम्हालाही कमजोर समजू नका. आम्हीही ताकदीने लढू. आमच्याशिवाय कुणाचीही सत्ता येणार नाही, अशी परिस्थिती नागपुरात निर्माण करून दाखवू, असा दावा सावंत यांनी केला.
प्रकाश जाधव म्हणाले, भाजपाला आपला पहिला शत्रू माना. त्यासाठी रात्रभर जागून काम करा. ज्याला भाजपशी दोस्ती करायची आहे, त्याने खुशाल करावी.
मात्र, रात्री भाजप नेत्यांजवळ बसायचे व दिवसा शिवसेनेला मार्गदर्शन करायचे, हे बंद करा, असे त्यांनी शिवसेनेतील दुटप्पी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना सुनावले. आशिष जयस्वाल यांनीही सर्वच जागा लढवून कार्यकर्ते तयार करण्याचा मानस व्यक्त केला. सतीश हरडे यांनी महापालिकेच्या शाळा बंद करून इमारती भाजप नेत्यांच्या संस्थांना दिल्या जात असल्याचा आरोप केला. शहर प्रमुख मंगेश काशीकर यांनी सत्ता स्थापनेनंतर भाजपने शिवसेनेशी बेईमानी करीत उपमहापौर पदन दिल्याचे सांगत आता जिद्दीने महापालिकेवर भगवा फडकवू, असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी किरण पांडव, सुरज गोजे, राजू हरणे, संदीप इटकेलवार, हर्षल काकडे, अलका दलाल, मंगला गवरे, बंडू तळवेकर, जगतराम सिन्हा, वंदना लोणकर, डिगांबर ठाकरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

एक माणूस तिकीट वाटणार नाही
कुणीही एक माणूस नागपुरात तिकीट वाटणार नाही. दोन समित्या नेमल्या जातील. प्रत्येकाच्या मुलाखती होऊन यादी तयार केली जाईल. उमेदवाराचे मेरिट पाहून तिकीट दिले जाईल, असे सांगत संपर्क प्रमुख सावंत यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
सावरबांधे यांना चिमटा
माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांना प्रकाश जाधव यांनी चिमटे काढले. पक्ष सोडून गेले, आता तिकडेच सुखी रहा. परत येऊन आमचे घर कशाला उद्ध्वस्त करता ? उडाले ते कावळे, राहिले ते मावळे असे म्हणत जाधव यांनी अप्रत्यक्षपणे सावरबांधे यांच्या एन्ट्रीला जाहीर विरोध केला.

 

Web Title: BJP is the first enemy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.