महाराष्ट्रात भाजपाला आत्मचिंतनाची आवश्यकता नाही
By योगेश पांडे | Updated: May 15, 2023 17:58 IST2023-05-15T17:57:18+5:302023-05-15T17:58:07+5:30
Nagpur News कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतर महाराष्ट्रातदेखील मंथनाची आवश्यकता असल्याचा अनेकांचा सूर आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र राज्यात भाजप मजबूत असल्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्रात भाजपाला आत्मचिंतनाची आवश्यकता नाही
योगेश पांडे
नागपूर : कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतर महाराष्ट्रातदेखील मंथनाची आवश्यकता असल्याचा अनेकांचा सूर आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र राज्यात भाजप मजबूत असल्याचा दावा केला आहे. कर्नाटकात झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षच निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष आहे. सरकार आणि संघटना मिळून आम्ही ५१ टक्के जागा मिळविण्याच्या तयारीवर भर देत आहोत. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचा विजय झाला याची कारणे वेगळी आहे. तेथील राजकारण, मुद्दे वेगळे आहे, त्यामुळे कर्नाटकचा महाराष्ट्राशी काहीच संबंध नाही. एखाद्या निवडणुकीत फायदा झाला तर दुसऱ्या निवडणुकीत फायदा होईल असेही नाही, असे ते म्हणाले. लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्रित होतील या चर्चांचेदेखील त्यांनी खंडन केले. लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होतील अशी शक्यता आज तरी दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिने विधानसभा अस्तित्वात राहणार आहे. आजच अंदाज व्यक्त करणे घाईचे होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
राज्यात युवा संवाद यात्रा
भाजपशी तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात जोडण्यासाठी युवा संवाद यात्रा काढली जाणार आहे. प्रत्येक बूथवर २५ युवा वॉरिअर्स तयार करण्याची योजना आखली आहे. यासोबतच महाराष्ट्रात ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांसाठी तयारी करणार आहोत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.