जनतेच्या प्रश्नांनी भाजप नगरसेवक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST2021-02-06T04:12:52+5:302021-02-06T04:12:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेने शहरातील ६९ उद्याने बीओटी तत्त्वावर खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यानांमध्ये प्रवेश ...

BJP corporator harassed by public questions | जनतेच्या प्रश्नांनी भाजप नगरसेवक हैराण

जनतेच्या प्रश्नांनी भाजप नगरसेवक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेने शहरातील ६९ उद्याने बीओटी तत्त्वावर खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यानांमध्ये प्रवेश करण्यासाठी नागरिकांना दररोजचे शुल्क द्यावे लागणार आहे. या निर्णयाविरुद्ध शहरात असंतोष पसरत असून, लोकप्रतिनिधींना याबाबत जाब विचारला जात आहे. विशेषत: जनतेच्या प्रश्नांनी मनपातील सत्ताधारी असलेल्या भाजपचे नगरसेवक हैराण झाले आहेत. नगरसेवक दिसताच अनेकजण त्यांना थेट जाब विचारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उद्यानांमध्ये शुल्क लावण्यासंदर्भात जनतेचे मत विचारात न घेता निर्णय घेण्यात आला. अनेक नागरिकांच्या अगदी घरासमोर किंवा घराजवळ उद्याने आहेत. दररोज सकाळी व सायंकाळी फिरणे, व्यायाम आदींसाठी नागरिक जात असतात. काहींनी तर उद्यानांतील त्रुटी नगरसेवकांच्या मागे लागून दूर करवून घेतल्या. मात्र, आता शुल्क लागल्यास घरासमोरील उद्यानात जाताना अनावश्यक भुर्दंड पडणार आहे. यामुळे नागरिकांची नाराजी नगरसेवकांवर निघत आहे. ज्या प्रभागांमध्ये भाजपचे नगरसेवक आहेत, तेथे अनेकांना त्यांना प्रत्यक्ष भेटून, तसेच फोनवर प्रश्नांचा भडीमार केला आहे. ज्यावेळी चर्चा होत होती तेव्हा परिसरातील नागरिकांना जो त्रास होईल त्याचा विचार का केला नाही, असा प्रश्नदेखील विचारला जात आहे.

नगरसेवकदेखील अस्वस्थ

दरम्यान, नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेता आता नगरसेवकदेखील काहीसे अस्वस्थ झाले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत, तर कुणीही या प्रस्तावाला आक्षेप घेतला नाही. मात्र, आता नागरिकांच्या प्रश्नांना तोंड देताना अनेकांच्या नाकीनऊ आले आहेत.

भाजप नेते महापौरांशी चर्चा करणार

यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके यांना विचारणा केली असता त्यांनी या मुद्द्यावर लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. उद्यानांच्या मुद्द्यावर महापौर दयाशंकर तिवारी यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: BJP corporator harassed by public questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.