भाजपाला देश चालविता येत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:07 IST2021-02-15T04:07:37+5:302021-02-15T04:07:37+5:30
नागपूर : भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात तीन पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. हा निर्णय योग्य असल्याचे ...

भाजपाला देश चालविता येत नाही
नागपूर : भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात तीन पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. हा निर्णय योग्य असल्याचे जनतेला कळून आले आहे. मुख्य म्हणजे भाजपाला देश चालविता येत नाही. त्यांच्या सरकारचे निर्णय देशहितासाठी घातक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिली.
एका खासगी कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता त्यांनी सदर प्रतिनिधीशी संवाद साधला. थोरात म्हणाले, महाविकास आघाडीतील मंत्री एकत्र बसून जनतेच्या हिताचे निर्णय घेतात. दर मंगळवारी तिन्ही पक्षांचे मंत्री अजित पवार, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेत असतात. सर्व निर्णय जनतेच्या हितासाठीच असतात. एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षात सोनिया गांधी जे निर्णय घेतात, ते सर्वांना मान्य असतात. राहुल गांधी उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष बनावे, अशी व्यक्तिगत इच्छा आहे. शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहे. महाविकास आघाडीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
थोरात म्हणाले, आरशात पहा, पुढच्या विरोधी पक्षाचा नेता दिसेल, असे मी कोल्हापूरच्या सभेत म्हणालो होतो. मी पुन्हा येईल, हे तर दूरच राज्यात भाजपा सत्तेत कधीही येणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. नाना पटोले यांच्यासंदर्भात ते म्हणाले, प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे असते. ते चांगले नेते आहे. कार्यकर्त्यांची बांधणी चांगली करतील, असा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस पक्ष नव्या उमेदीने काम करेल.
राज्यात चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणी त्यांनी उत्तर देण्यास टाळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. चौकशीचा अहवाल येईपर्यंत थांबावे. त्यानंतरच काही ठोस निर्णय घेता येईल. या प्रकरणी आता कुठल्याही नेत्याचे नाव घेणे योग्य ठरणार नाही.