वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:08 IST2021-04-06T04:08:39+5:302021-04-06T04:08:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करून घराकडे निघालेल्या एका तरुण अभियंत्यावर काळाने रस्त्यात झडप घातली. दुचाकी ...

वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करून घराकडे निघालेल्या एका तरुण अभियंत्यावर काळाने रस्त्यात झडप घातली. दुचाकी अनियंत्रित होऊन हर्षद नंदकिशोर उजवणे (वय २३) हा तरुण दुचाकीसह खाली पडला आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. वर्धा मार्गावरील नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलजवळ रविवारी रात्री हा भीषण अपघात घडला. या अपघातात हर्षदसोबत बुलेटवर बसलेला त्याचा मित्र संकल्प संजय उडाण हा जबर जखमी झाला.
मनीषनगर बेसा येथे राहणाऱ्या हर्षदने अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्याचे वडील खासगी जॉब करतात तर आई गृहिणी आहे. हर्षदला सर्वेश आणि सिद्धेश नामक दोन जुळी भावंड आहेत. त्यातील एक पुण्याला शिकतो. तर दुसरा नागपुरातच शिकतो.
रविवारी रात्री वाढदिवसाच्या निमित्ताने हर्षद त्याच्या सहा ते सात मित्रांसोबत वर्धा मार्गावरील पांजरीच्या सरदार ढाब्यावर जेवण करायला गेला होता. रात्री ११.४५ च्या सुमारास हर्षद त्याच्या बुलेटने परत येत होता. मागे संकल्प नामक मित्र बसून होता. जबलपूर बायपास मार्गावर नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलसमोर हर्षदची बुलेट अनियंत्रित होऊन गिट्टीच्या ढिगाऱ्यावर आदळली. त्यामुळे हर्षद तसेच संकल्प दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना शुअरटेक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हर्षदच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. संकल्पवर उपचार सुरू आहे. हिंगण्याचे पोलीस उपनिरीक्षक मल्हारी डोईफोडे यांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---
घरची मंडळी वाटच बघत राहिली
रात्री ११.३० पर्यंत परत येतो, असे त्याने घरच्यांना सांगितले होते. त्यामुळे घरची मंडळी हर्षदची वाट बघत होती. तेवढ्यात त्याच्या एका मित्राचा फोन आला. हर्षदला अपघात झाला तुम्ही रुग्णालयात पोहचा, असे त्याने सांगितले. त्यानुसार, हर्षदचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये पोहचले असता डॉक्टरांनी त्यांना हर्षदचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हर्षदच्या मृत्यूमुळे त्याच्या आई आणि लहान भावाला जबर मानसिक धक्का बसला असून आईची अनेकदा शुद्ध हरवली. सुस्वभावी हर्षदच्या मृत्यूमुळे मनीषनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
----