जन्मांध परी मी, प्रकाशवाट दाखवितो

By Admin | Updated: February 9, 2015 00:59 IST2015-02-09T00:59:35+5:302015-02-09T00:59:35+5:30

त्याच्या आयुष्यात सृष्टीतील रंगांना स्थानच नाही. जन्म देणारी आई, बाबांना तो पाहू शकत नाही. परंतु या दु:खाला कवटाळत न बसता लहान वयातच त्याने ‘फिनिक्स झेप’ घेतली. स्वत:

Birthday fairy, I show light | जन्मांध परी मी, प्रकाशवाट दाखवितो

जन्मांध परी मी, प्रकाशवाट दाखवितो

लहानग्या चेतनची सेवायात्रा : समाजप्रबोधन ते समाजसेवा
योगेश पांडे - नागपूर
त्याच्या आयुष्यात सृष्टीतील रंगांना स्थानच नाही. जन्म देणारी आई, बाबांना तो पाहू शकत नाही. परंतु या दु:खाला कवटाळत न बसता लहान वयातच त्याने ‘फिनिक्स झेप’ घेतली. स्वत: अंधारात असतानादेखील त्याने दुसऱ्यांना समाजप्रबोधनातून प्रकाशवाट दाखविण्याचा संकल्प केला अन् त्याची सेवायात्रा सुरू झाली. गावोगाव गाणे अन् व्याख्यानाचे कार्यक्रम करून मिळणाऱ्या मानधनातून त्याने अनेक सौर कंदिलांचे वाटप करुन एक आदर्श निर्माण केला आहे. वाशीममधील केकतउमरा गावात एका झोपडीत राहणाऱ्या आठ वर्षीय चेतन उचितकर या लहानग्याने जगासमोर समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ‘सेवाकुंभ २०१५’ या कार्यक्रमात चेतनचा सत्कार करण्यात आला. चेतन लहानपणापासूनच दृष्टिहीन आहे. परंतु दृष्टिहीन असल्याचे दु:ख करण्यापेक्षा आपल्या वाणीतून आठ वर्षांचा चेतन हा इतरांना आनंदी जीवन जगण्याचा संदेश देत आहे. स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, विद्यार्थी-शेतकरी आत्महत्या आणि नेत्रदान या ज्वलंत विषयांवर तो राज्यभर व्याख्यानातून प्रबोधन करत आहे.
वयाच्या सहाव्या वर्षांपासून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये चेतनने आतापर्यंत २६ जिल्ह्यांमध्ये १८२ कार्यक्रम केले आहेत. सध्या चौथीत शिकत असलेल्या चेतनचे ब्रेल लिपीतून घरच्याघरी शिक्षण सुरू आहे. त्या शिवाय गाण्याचे आणि विविध वाद्यांचे शिक्षणही सुरू आहे. वाशिममध्ये भारनियमन असलेल्या गावांतील घरांमध्ये मुलांना अभ्यास करण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून त्याने सौरकंदिलांचे वाटप त्यांनी केले आहे. चेतनच्या कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून उचितकर कुटुंबीयांनी चेतनच्याच वयाच्या मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे. गरजू मुलांना गणवेशांचे वाटप, शालेय साहित्याचे वाटप असे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. चेतनचे वडील पांडुरंग उचितकर हे शेतकरी आहेत. आपले रोजचे सर्व काम सांभाळून चेतनला गावोगावी फिरवण्याची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. चेतनचे गाण्याचे गुरू परवीन कठाळे यांची त्यांना साथ आहे.
शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका !
सेवाकुंभ २०१५ मध्ये सत्कार स्वीकारल्यानंतर चेतन उचितकर याने शेतकऱ्यांना उद्देशून कमी शब्दांत मोठा संदेश दिला. माझ्या आयुष्यात प्रकाशाचा दुष्काळ आहे, पण मी सकारात्मकपणे जगतो आहे. तुम्ही तर धडधाकट आहात, मग नैसर्गिक दुष्काळाने खचून का जाता? आत्महत्या करण्याऐवजी कुठलातरी दुसरा व्यवसाय किंवा इतर कुठले काम करा. पण आत्महत्या करू नका, असे कळकळीचे आवाहन त्याने केले. स्वत:च्या अंधारमय आयुष्यातून वाट शोधत जगाला माणुसकीचा संदेश देणारा चेतन बोलका झाला अन् त्याचे शब्द उपस्थितांच्या हृदयाला भिडले.
कलेचा साधक
चेतन हार्मोनियम, तबला वादन शिकला आहे. तो हार्मोनियमवर शास्त्रीय संगीताचे ३४ राग वाजवतो. माऊथआॅर्गनवर त्याला २१०० गाण्यांच्या धून वाजविता येतात. विशेष म्हणजे बेरीज-वजाबाकी तो तोंडीच करू शकतो.

Web Title: Birthday fairy, I show light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.