‘बर्थ डे’ पार्टी बेतली जीवावर
By Admin | Updated: June 17, 2016 03:05 IST2016-06-17T03:05:34+5:302016-06-17T03:05:34+5:30
मित्रांसोबत ‘बर्थ डे पार्टी’ साजरी करण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला.
_ns.jpg)
‘बर्थ डे’ पार्टी बेतली जीवावर
पाच जण बुडाले : वडगाव व मोहगाव झिल्पी जलाशयातील घटना
बेला/ हिंगणा : मित्रांसोबत ‘बर्थ डे पार्टी’ साजरी करण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला. उमरेड तालुक्यातील बेला शिवारातील वडगाव जलाशयात चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण बचावला. दुसरीकडे हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी जलाशयात एका तरुणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, दोन्ही जलाशय पोहण्यासाठी प्रतिबंधित असून, तसा फलक तिथे लावण्यात आला आहे.
आदित्य चरडे (१७, रा. अभिजितनगर, नागपूर), विक्की शंकर ऊ र्फ शांताराम दवंडे (२५, रा. चिंतामणीनगर, नागपूर), राहुल राजेंद्र नागदेवे (२५, रा. अभिजितनगर, नागपूर) व शुभम चरडे (२३, रा. नाचणगाव, जिल्हा वर्धा) अशी वडगाव जलाशयातील मृतांची नावे आहेत. आदित्यचा गुरुवारी (दि. १६) वाढदिवस होता. त्यामुळे त्याच्या मित्रांसोबत बर्थ डे पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी वडगाव जलाशयाजवळ गेला होता. त्याच्यासोबत या चौघांशिवाय दिनेश अरुण मरकाम (१९, रा. अभिजितनगर, नागपूर) हा देखील होता. हे सर्व जण दुपारी २ वाजताच्या सुमारास जलाशयाजवळ पोहोचले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास चौघेही जलाशयात पोहण्यासाठी उतरले. विशेष म्हणजे, चौघांपैकी कुणालाही पोहता येत नव्हते. दिनेशला पाण्याची भीती वाटत असल्याने तो काठावर बसून होता.
पोहण्याच्या प्रयत्नात चौघेही खोल पाण्यात गेले आणि बुडायला लागले. त्यातच त्यांनी आरडाओरड केली. दिनेशनेही आरडाओरड करून मदत मागितली. परिणामी, परिसरातील नागरिकांनी जलाशयाकडे धाव घेतली. तोपर्यंत चौघेही दिसेनासे झाले होते. माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, सहायक पोलीस निरीक्षक मोते व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिक कोळी दिलीप दुर्गे व वसंता शेंडे यांच्या मदतीने चौघांचे मृतदेह बाहेर काढले.
दुसरी घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहगाव झिल्पी तलावात बुधवारी दुपारी घडली असून, त्याचा मृतदेह गुरुवारी दुपारी पाण्याबाहेर काढण्यात आला.