कोट्यवधीचा गोलमाल
By Admin | Updated: May 21, 2015 02:19 IST2015-05-21T02:19:35+5:302015-05-21T02:19:35+5:30
नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशनशी संबंधित कोट्यवधीच्या अपहार प्रकरणी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने बुधवारी असोसिएशनच्या कार्यालयासह नऊ ठिकाणी धाड टाकली.

कोट्यवधीचा गोलमाल
नागपूर : नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशनशी संबंधित कोट्यवधीच्या अपहार प्रकरणी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने बुधवारी असोसिएशनच्या कार्यालयासह नऊ ठिकाणी धाड टाकली. या कारवाईमुळे टिंबर व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
हे प्रकरण २००८ ते २०११ दरम्यान घडलेले आहे. सूत्रांनुसार टिंबर मर्चंट असोसिएशनच्या भवनासाठी जागेची आवश्यकता होती. असोसिएशनचे अध्यक्ष व ट्रस्टींनी सदस्यांची परवानगी न घेता जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ट्रस्टींनी कृष्ण कृपा डेव्हलपर्सची स्थापना केली. जमीन खरेदीसाठी असोसिएशनने फिक्स डिपॉझिट योजनेला मध्येच बंद करून त्यातील ४२ लाख ३० हजार रुपये कृष्ण कृपा डेव्हलपर्सला जारी करण्यात आले. डेव्हलपर्सला दिलेला निधी योग्य असल्याचे दर्शविण्यासाठी एका दाम्पत्याच्या जमिनीचे बोगस करार करून ती जागा खरेदी करण्यात आल्याचे खोटे दस्ताऐवज तयार केले. कृष्ण कृपा डेव्हलपर्सच्या माध्यमातून एक कोटी रुपयांमधून १० एकर जागा खरेदी करण्यात आली. १० एकरपैकी ३० हजार फूट जमीन असोसिएशनला ३४ लाख रुपयात विकण्यात आली. उर्वरित ८ लाख रुपये परत केले. उर्वरित जमीन कृष्ण कृपा डेव्हलपर्सच्या संचालकांनी प्लॉट तयार करून विकले. हे संचालक नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशनचेही ट्रस्टी होते. हा अपहार उघडकीस आल्यावर असोसिएशनचे सदस्य हसमुख पटेलयांनी गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी असोसिएशनचे अध्यक्ष प्रभूदास पटेल, जयंती पटेल, गोविंद पटेल आणि लखमशी पटेल यांना आरोपी बनविले. एफआरआय रद्द करण्याच्या मागणीसाठी आरोपी उच्च न्यायालयात गेले. परंतु त्यांना तेथून मदत मिळाली नाही. या दरम्यान गुन्हे शाखा पोलिसांनी धर्मादाय आयुक्तांकडून असोसिएशनचे संपूर्ण अंकेक्षण करण्याचे आदेश मिळविले. पूर्ण अंकेक्षणात असोसिएशनद्वारा करण्यात आलेले इतर अपहारही समोर आले. असोसिएशनद्वारा टिंबर भवनला भाड्यावर देण्यात आल्यानंतर येणाऱ्या रकमेतही अपहार झाल्याचे सांगितले जाते. पूर्ण अंकेक्षणात लोकांना वितरित करण्यात आलेल्या रकमांच्या बोगस रसिदा सुद्धा जप्त करण्यात आल्या. अशा लोकांचे बयाणसुद्धा नोंदविण्यात आले. या आधारावर नऊ ट्रस्टींच्या विरोधात अपहाराचा नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यालाही ट्रस्टींनी न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने दोन्ही प्रकरण एकत्र करण्याचे आदेश देत चौकशीवर लावलेली बंदी हटविली आहे. त्यामुळे आर्थिक शााखेने नव्याने चौकशी सुरू केली. यादरम्यान नऊ आरोपींच्या घरांवर, असोसिएशनचे लकडगंज येथील कार्यालय आणि कृष्ण कृपा डेव्हलपर्सच्या कार्यालयावर धाड टाकली. येथून रजिस्ट्री, मिनिट बुक, पावती, आॅडीट रिपोर्ट, विक्री जप्त करण्यात आले. (प्रतिनिधी)