कनेक्शन नसतानाही पाठविले बिल
By Admin | Updated: February 7, 2015 02:09 IST2015-02-07T02:09:41+5:302015-02-07T02:09:41+5:30
तिकोना ब्रॉडबँड सर्व्हिसेसचा आणखी एक बोगसपणा उघडकीस आला आहे. कंपनीतील काही लोकं ग्राहकांकडून जबरी वसुली करीत आहे ...

कनेक्शन नसतानाही पाठविले बिल
नागपूर : तिकोना ब्रॉडबँड सर्व्हिसेसचा आणखी एक बोगसपणा उघडकीस आला आहे. कंपनीतील काही लोकं ग्राहकांकडून जबरी वसुली करीत आहे आणि यासाठी त्यांना धमकी देणारे फोन केले जात आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे तिकोनाचे कनेक्शन नाही, अशा लोकांनाही बिल पाठविले जात आहे, याचा खुलासा एका प्रतिष्ठित नागरिकाने केला आहे.
तिकोना ब्रॉडबँड कंपनीद्वारा ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकरण लोकमत मागील काही दिवसांपासून प्रामुख्याने प्रकाशित करीत आहे. यात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. अमरावती रोड चिटणवीसनगर येथील अली हातिम हुसैन यांनी तिकोना ब्रॉडबँड सर्व्हिसेसकडून मिळत असलेल्या धमकीचा खुलासा केला आहे. हुसैन यांच्यानुसार त्यांनी आजपर्यंत तिकोना ब्रॉडबँड सर्व्हिसेस कंपनीच्या सेवेचा वापर केलेला नाही. परंतु त्यांना बील पाठवण्यात येतो. पाठविलेल्या बिलामध्ये त्यांनी वापर केलेल्या सर्व्हिसेसची संख्या शून्य दाखविलेली असते. सोबतच बिल न भरल्यास भरावयाच्या आर्थिक दंडाची रक्कम सुद्धा दर्शविलेली असते.
व्यवसायाने सीए असलेले अली हातिम हुसैन यांनी सांगितले की, चार-पाच वर्षांपूर्वी त्यांनी तिकोना ब्रॉडबँडची सेवा घेण्यासाठी एक प्लान पाहिला होता. परंतु त्यांनी प्लान घेतला नाही. दरम्यान त्यांना ‘वायफाय कनेक्ट’ करण्याबाबत अनेक आकर्षक प्रलोभने देण्यात आली. परंतु त्यांनी कनेक्शन घेतले नाही. त्यानंतर कंपनीकडून त्यांना बिल येऊ लागले. हुसैन यांनी यासंदर्भात ४ फेब्रुवारी २०११ रोजी कंपनीला आॅनलाईन तक्रार केली होती. परंतु कंपनीकडून त्यांना मनमानी पद्धतीने बिल पाठविले जात आहे. आजही त्यांना बिल येत आहे.