लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता नागपुरातही बाइक टॅक्सी सुरू होणार आहे. या बाइक इलेक्ट्रिक राहणार असून त्यावर पिवळा रंग असणार आहे चालकाचे वय २० वर्षांहून अधिक व ५० वर्षांपेक्षा कमी असावे आदी नियमही घालून देण्यात आले आहे.
ज्याला बाइक टॅक्सीचा व्यवसाय करायचा आहे त्या अॅग्रीगेटरकडे किमान ५० इलेक्ट्रिक बाइक असणे आवश्यक आहे. त्याला राज्य परिवहन प्राधिकरणयांच्याकडून एकच परवाना देण्यात येणार आहे. या परवान्याची वैधता पाच वर्षाची असेल. सर्व बाइक पिवळ्या रंगात असाव्यात आणि त्यावर बाइक-टॅक्सी असे लिहिणे, दुचाकी-टॅक्सीवर सेवा-प्रदात्याचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक राहणार आहे.
बाइक टॅक्सीचालकाकडे बेंज असण्यासोबतच चालकाचे वय २० वषार्पेक्षा कमी आणि ५० वर्षापेक्षा जास्त नसण्याची अट आहे. त्यामुळे या व्यवसायात तरुणांची संख्या वाढणार आहे. सोबतच दरदिवशी दुचाकी चालविण्याकरिता ८ तासांची मर्यादा असणार आहे.
महिला चालकांचे वाढणार प्रमाणकाही कालावधीनंतर महिला चालकांचे प्रमाण टप्प्याटप्याने वाढवून ते ५० टक्के करण्याची जबाबदारी परवानाधारकाची राहणार आहे. बाइक टॅक्सीकरिता परवानाधारकाने दुचाकी-टॅक्सी स्थानक, चढण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण दर्शवणे आवश्यक राहणार आहे.
१२ वर्षांखालील मुलांना परवानगी नसणारप्रवाशांचा सुरक्षतेसाठी बाइक टॅक्सीमधून एकावेळी एकाच प्रवाशाला घेऊन जाता येणार आहे. १२ वर्षाखालील मुलांना प्रवासाकरिता परवानगी नसेल. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बाइक टॅक्सींना प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये विभाजक बसविण्यात येतील. जीपीएस ट्रेकिंग, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, दुचाकी चालक आणि प्रवासी यांकरिता हेल्मेट बंधनकारक असेल. अपघात आणि मृत्यू या दोन्हींकरिताचे विमा संरक्षण सेवा प्रदात्याने उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.
लवकरच ठरवले जाणार दरबाइक टॅक्सीच्या दराचे नियंत्रण संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून करण्यात येईल. त्यामुळे लवकरच दर ठरविण्यात येईल. नियमात बसणा-या अॅग्रीगेटरला मान्यता देण्यात येईल. तूर्तास एकही अॅग्रीगेटरने अर्ज केलेला नाही.विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण