बिहारची ‘बहार’ नागपुरातही

By Admin | Updated: November 9, 2015 05:30 IST2015-11-09T05:30:05+5:302015-11-09T05:30:05+5:30

बिहार निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव आणि महाआघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी

In Bihar's Bahar, Nagpur too | बिहारची ‘बहार’ नागपुरातही

बिहारची ‘बहार’ नागपुरातही

नागपूर : बिहार निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव आणि महाआघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपराजधानीत जोरदार जल्लोष केला. सकाळच्या सुमारास संघस्थान असलेल्या रेशीमबाग स्मृतिमंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच आतषबाजी करण्यात आली. दुपारी व्हेरायटी चौकात मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमधील अपयशानंतर मागील आठवड्यात नगर पंचायत निवडणुकांमध्ये मिळालेले यश व आता बिहारमधील दणदणीत विजय यामुळे शहर कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
बिहारमध्ये निकाल लागला असला तरी संघभूमी असल्यामुळे नागपूरकडे देशाचे लक्ष लागले होते. सकाळी निकालांचे कल समोर येताच, महाआघाडीचा विजय निश्चित झाला व रेशीमबाग परिसरात युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले. लोकांची शाळा समोरून कार्यकर्त्यांनी मिरवणुकीला सुरुवात केली व बंटी शेळकेच्या नेतृत्वातील कार्यकर्त्यांनी केशवद्वाराजवळ अक्षरश: दिवाळी साजरी केली. ढोलताशांच्या तालावर नाचत काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.
व्हेरायटी चौकात दुपारी ४ च्या सुमारास शहर कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह शहर कॉंग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी जल्लोष केला व विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी ‘गुब्बारा फुटला’ असे लिहिलेले ‘पोस्टर्स’देखील कार्यकर्त्यांनी आणले होते. आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीदेखील संविधान चौकात दुपारी १ वाजता आतषबाजी करुन विजयाचा जल्लोष केला. हा लोकशाहीचा विजय असल्याचे मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Web Title: In Bihar's Bahar, Nagpur too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.