बाहुला-बाहुलीच्या लग्नात चिमुकल्यांची धम्माल
By Admin | Updated: May 19, 2016 02:48 IST2016-05-19T02:48:21+5:302016-05-19T02:48:21+5:30
लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि मौज मस्तीची नुसती धमालच. दीनदयाल शोध संस्थानच्या बालजगततर्फे

बाहुला-बाहुलीच्या लग्नात चिमुकल्यांची धम्माल
बालजगतचे आयोजन : चिमुकल्यांसह पालकही आनंदसोहळ्यात सहभागी
नागपूर : लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि मौज मस्तीची नुसती धमालच. दीनदयाल शोध संस्थानच्या बालजगततर्फे लक्ष्मीनगर येथे बुधवारी अशाच एका खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अर्थातच हा विवाह सोहळा होता पण चिमुकल्यांच्या बाहुला - बाहुलीचा. बालरंजन यांचा मुलगा आणि शिशुरंजन यांची कन्या यांचा हा विवाह होता. त्यांच्या या विवाहाला तमाम बच्चे कंपनी, पालक आणि मुलांच्या भावविश्वातील लाडके सवंगडी डोरेमन, शिनचॅन, नोबिता, छोटा भीम, निन्जा हातोडी, माईटी रोजू, जॉगी, स्पायडरमॅन, बॅटमॅन, आर्यन मॅन, हॉरेल्ड हेंड्री, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक पॅँथर, मोटू पतलू, हनुमान यांच्या वेशात होते.
सारेच वऱ्हाडी नटूनथटून असल्याने वातावरणात रंगीबेरंगी माहोल होता. स्व. नानाजी जोग संस्थापित आणि थोर समाजसेविका स्व. सुमतीताई सुकळीकर यांनी खास बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता मनोरंजनासह कार्यान्वित केलेल्या या संस्थेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच जगदीश सुकळीकर आणि सदस्यांनी हे कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे.
बालकांसाठी राबविल्या जाणाऱ्या अनेक कल्पक योजनांसह दरवर्षी या ठिकाणी साजरा होणारा बाहुला-बाहुलीचा विवाह सोहळा हा सगळ्यांच्याच खास आवडीचा विषय झाला आहे. बुधवारी गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा थाटात पार पडला. चमकत्या पताकांनी सजविलेला लग्नमंडप, रांगोळ्यांचे सुशोभन, आकर्षक रुखवंतांची सजावट, मंगलाष्टकांचा निनाद, वऱ्हाड्यांची भरगच्च उपस्थिती आणि शुभमंगल सावधान. पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.
या लग्नातही हळदीचा कार्यक्रम, संगीताचे स्वर, सजवलेल्या बाबागाडीत नवरा-नवरीची दिमाखदार वरात आदी सारेच मुलांनी एन्जॉय केले.
चॉकलेट, बिस्किट आणि खाऊचा अहेरही देण्यात आला. आजच्या बदलत्या वातावरणात बालकांच्या मानसिकतेला जपणाऱ्या या आनंदसोहळ्याचे आयोजन संस्थेचे सचिव जगदीश सुकळीकर, अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, नम्रता पिंपळखुटे, सुवर्णा भाके, पल्लवी देशपांडे यांनी केले. नृत्य करीत, मस्ती करीत आणि गीतांचे गायन करीत लहान मुलांनी हा विवाह सोहळा आनंदात साजरा केला, पण यात त्यांचे पालकही गुंतले होते. (प्रतिनिधी)