मोठ्या प्रभागात होणार ‘बिग फाईट’

By Admin | Updated: November 17, 2016 02:48 IST2016-11-17T02:48:41+5:302016-11-17T02:48:41+5:30

शहरातील मोठ्या बाजारपेठांचा परिसर असलेल्या प्रभाग १९ मध्ये दिग्गज नावांचा समावेश असून येथे सर्वच पक्षांमध्ये तिकिटासाठी चुरस दिसून येत आहे.

Big Fight | मोठ्या प्रभागात होणार ‘बिग फाईट’

मोठ्या प्रभागात होणार ‘बिग फाईट’

दयाशंकर तिवारी,
बालपांडे यांची दावेदारी

दीपक पटेल, गनी खान, रमण ठवकरही तयारीत
कॉंग्रेसकडून महिलांमध्ये प्रज्ञा बडवाईक, रिचा जैन इच्छुक


नागपूर : शहरातील मोठ्या बाजारपेठांचा परिसर असलेल्या प्रभाग १९ मध्ये दिग्गज नावांचा समावेश असून येथे सर्वच पक्षांमध्ये तिकिटासाठी चुरस दिसून येत आहे. मनपाचे सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, नगरसेवक अ‍ॅड. संजयकुमार बालपांडे, कॉंग्रेस-लोकमंचचे दीपक पटेल, माजी स्थायी समिती अध्यक्ष गनी खान, राष्ट्रवादीचे रमण ठवकर, महिला कॉंग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक इत्यादी मोठी नावे या प्रभागात आहेत. त्यामुळे या प्रभागात ‘बिग फाईट’ निश्चितच दिसून येणार आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता येथे उमेदवारांची नावे अंतिम करणे हे पक्षांसमोर एक आव्हानच राहणार आहे.
नव्या प्रभाग क्रमांक १९ मध्ये २०१२ च्या प्रभाग पद्धतीनुसार २७, २९, ३०, ४० व ३९ या ५ प्रभागांमधील थोडाअधिक भाग समाविष्ट झाला आहे. यात भाजपाचे दयाशंकर तिवारी, अ‍ॅड.संजयकुमार बालपांडे, विद्या कन्हेरे, कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक पटेल, हर्षला मनोज साबळे, या नगरसेवकांचा भाग प्रामुख्याने येत आहे. मध्य नागपुरातील प्रमुख बाजारपेठांचा या प्रभागात समावेश असून भौगोलिकदृष्ट्यादेखील हा प्रभाग बराच मोठा आहे. या प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. प्रभागातील अनेक भाग मुस्लिम बहुल असून मतदारांचा आकडा हा १५ हजारांहून अधिक आहे. तर जैन समाजाची मतेदेखील येथे महत्त्वाची ठरु शकतात.
या प्रभागातून अनेक आजी-माजी नगरसेवक तसेच पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. कॉंग्रेसचे शहर कार्यालय देवडिया भवन तसेच संघाचे वर्चस्व असलेला बडकस चौकातील भागदेखील याच प्रभागात येत असल्यामुळे कॉंग्रेस-भाजपाची येथे प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, हे निश्चित.
प्रभाग १९ मधील ‘अ’ भाग हा ‘ओबीसी’ गटासाठी राखीव आहे. भाजपातर्फे विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. संजय बालपांडे यांची यंदादेखील दावेदारी आहे. मागील निवडणुकांमध्ये त्यांनी ७०० हून अधिक मतांनी विजय मिळविला होता. कॉंग्रेसचे जुल्फेकार आरिफ अहमद हे दुसऱ्या स्थानी होते. याशिवाय राजेश कन्हेरे, सुनील श्रीवास हेदेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. श्रीवास यांनी गांधीसागर भागातून मागील निवडणूकदेखील लढविली होती. मात्र त्यांना यश आले नव्हते. सुनील श्रीवास त्यांच्या पत्नीसाठीदेखील आग्रही असल्याची चर्चा आहे. याशिवाय भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष किशोर पाटील हे स्वत: किंवा पत्नीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नरत आहेत. सध्याच्या प्रभाग ४० चे अध्यक्ष अविनाश साहू, खुशाल साळवे, नरेश वाडीभस्मे यांची नावेदेखील चर्चेत आहेत. कॉंग्रेसकडूनदेखील इच्छुकांची यादी मोठी आहे. विद्यमान नगरसेवक दीपक पटेल यांची उमेदवारी कॉंग्रेस व लोकमंच यांच्या आघाडीवर अवलंबून आहे. गेल्या निवडणुकीत दीपक पटेल यांनी अडीच हजारहून अधिक मतांनी विजय मिळविला होता. त्यांना ७,१६९ मते मिळाली होती तर दुसऱ्या स्थानावर भाजपाचे सुनील श्रीवास होते. याशिवाय माजी नगरसेवक मोहम्मद कमाल हे स्वत: किंवा पत्नीला तिकीट मिळावे यासाठी इच्छुक आहेत. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अब्दुल गनी खान, फिरोझ खान यांची नावेदेखील चर्चेत आहेत. अब्दुल गनी खान हे पत्नीसाठी देखील प्रयत्नरत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शहर उपाध्यक्ष रमण ठवकर हे दावेदार आहेत. यापूर्वी २००२ मध्ये ठवकर लढले आहेत. याशिवाय रवी गाडगे पाटील यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. काँग्रेसशी आघाडी झाली तरी ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत.
ओबीसी महिला प्रवर्गात भाजपाकडून विद्यमान नगरसेविका विद्या कन्हेरे यांचा दावा आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी गांधीबाग प्रभागातून लढताना ५,४६९ मते घेत विजय मिळविला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दीपा रमण ठवकर यांना फक्त ३८२ मतांनी पराभव पत्करत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय वंदना ढिवरे, वंदना पाटील, सरला नायक या इच्छुक आहेत. सरला नायक यांनी मागील निवडणूक लढविली होती. कॉंग्रेसकडून महिला कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक यांची दावेदारी आहे. शालिनी ढोलके, फिरोझ खान यांच्या पत्नी, नूतन गंगोत्री यांचीही नावे चर्चेत आहेत.
सर्वसाधारण महिला प्रवर्गात भाजपाकडून २००२ साली निवडणूक लढविलेल्या साधना नायक तसेच विजयमाला गौर यादेखील उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. याशिवाय कॉंग्रेसच्या डॉ.रिचा जैन यांनी तिकिटासाठी दावा केला आहे. राष्ट्रवादीकडून लीलाताई शिंदे यांचे नाव चर्चेत आहे.
सर्वसाधारण पुरुष गटातून सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांचा दावा आहे. सलग चौथ्यांदा ते विजय मिळविण्यास इच्छुक आहेत. मागील निवडणूकांत दयाशंकर तिवारी यांनी ५,२६६ मतांसह विजय मिळविला होता. तर दुसऱ्या स्थानावर कॉंग्रेसचे सैफुद्दीन शेख हबीब हे होते. याशिवाय भाजपाच्या शहर कार्यकारिणीतील महत्त्वाचे नाव असलेले श्रीपाद रिसालदार हेदेखील तिकिटासाठी इच्छुक आहेत. सोबतच विलास त्रिवेदी, जयप्रकाश पारेख यांची नावेदेखील चर्चेत आहे. कॉंग्रेसतर्फे हसमुख साधवानी, इरफान काझी यांचा दावा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे येथून संजय शेवाळे, प्रा.एस.के.सिंह, मो.मिराजउद्दीन शेख, मेहबूब खान, चंद्रशेखर छप्परघरे यांनी आपली दावेदारी सादर केली आहे. शिवसेना व बसपाने पत्ते झाकून ठेवले आहेत. निवडणूकीच्या रणधुमाळीअगोदर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Big Fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.