कारागृहातील मोबाईलमागे दडला मोठा आर्थिक व्यवहार
By Admin | Updated: April 9, 2015 02:56 IST2015-04-09T02:56:46+5:302015-04-09T02:56:46+5:30
कारागृहात मोबाईल पोहोचण्यामागे मोठा आर्थिक व्यवहार दडलेला आहे, असा निष्कर्ष काढल्या जात आहे.

कारागृहातील मोबाईलमागे दडला मोठा आर्थिक व्यवहार
नागपूर : कारागृहात मोबाईल पोहोचण्यामागे मोठा आर्थिक व्यवहार दडलेला आहे, असा निष्कर्ष काढल्या जात आहे.
येथील खतरनाक गुंडांच्या टोळ्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर खंडणी वसुलीसाठी करतात. खुनाच्या मोठ्या रकमेच्या सुपाऱ्याही घेतल्या जातात. गुन्हेगारी टोळ्यांना मोबाईलच्या स्वरूपात आर्थिक लाभ पोहोचतो.
येथील अधिकारी किंवा सुरक्षा कर्मचारी हे लोकसेवकच आहेत. या भ्रष्ट लोकसेवकांना होणाऱ्या आर्थिक लाभाशिवाय मोबाईल आत पोहोचणे शक्यच नाही. मोठा आर्थिक मोबदला घेऊनच मोबाईल बंदिस्त गुन्हेगारांपर्यंत पोहोचवले जातात, असे मोक्काच्या कायद्यात गृहितच धरले जाते. दोषी अधिकारी किंवा कर्मचारी उघडपणे मोबाईलच्या माध्यमातून आॅर्गनाईज क्राईम सिंडिकेटला मदत करीत असल्याने ते महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलम २४ अन्वये जघन्य अपराध करीत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या सर्वांवर या कायद्याच्या कारवाईचे सावट पसरलेले आहे.
यापूर्वी अनिल धावडे प्रकरणात १६ मार्च २००४ रोजी कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सत्यनारायण शर्मा यांच्याविरुद्ध मोक्काची कारवाई झालेली आहे. वैद्यकीय सेवेच्या आड धावडेला त्याच्या घरी नेऊन सोडण्याची सेवा दिली जात होती. पुण्याच्या येरवडा कारागृहातही एका अधिकाऱ्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई झालेली आहे. (प्रतिनिधी)