पोलिसाला चाकू मारणाऱ्या भुसेला अडीच वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:40 IST2021-01-14T00:38:47+5:302021-01-14T00:40:01+5:30
Police stabbed case conviction पोलीस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला करणारा आरोपी बळीराम नरेंद्र भुसे (५२) याला सत्र न्यायालयाने बुधवारी अडीच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

पोलिसाला चाकू मारणाऱ्या भुसेला अडीच वर्षे कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला करणारा आरोपी बळीराम नरेंद्र भुसे (५२) याला सत्र न्यायालयाने बुधवारी अडीच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्या. अभिजित देशमुख यांनी हा निर्णय दिला. भुसे हा वरुड, जि. अमरावती येथील रहिवासी आहे.
प्रवीण घोडाम असे फिर्यादीचे नाव असून घटनेच्या वेळी ते विशेष शाखेत पाेलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत होते. ४ मार्च २०१८ रोजी शिवजयंती होती. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी महाल येथील शिवाजी पुतळा परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. घोडाम तेथे हजर होते. दरम्यान, भुसे हातात चाकू घेऊन त्या परिसरात फिरत होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर घोडाम यांनी भुसेकडे जाऊन त्याला चाकू फेकण्यास सांगितले. परंतु, त्याने ऐकले नाही. त्यामुळे घोडाम यांनी भुसेला पकडण्याचा प्रयत्न केला असता भुसेने घोडाम यांच्यावर चाकूने वार केला. त्यामुळे घोडाम यांच्या उजव्या हाताला गंभीर जखम झाली. त्यानंतर इतरांच्या मदतीने भुसेला पकडून चाकू हिसकावण्यात आला. गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून भुसेला अटक केली. न्यायालयात सरकारतर्फे ॲड. श्याम खुळे यांनी कामकाज पाहिले.