‘भारतमाता की जय’ने वेधले लक्ष
By Admin | Updated: April 19, 2016 06:53 IST2016-04-19T06:53:24+5:302016-04-19T06:53:24+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे सोमवारी सकाळी सक्करदरा चौक ते

‘भारतमाता की जय’ने वेधले लक्ष
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे सोमवारी सकाळी सक्करदरा चौक ते हेडगेवार भवन या मार्गावर रॅली काढण्यात आली. यावेळी मंचच्या मुस्लीम सदस्यांनी दिलेल्या ‘भारतमाता की जय’ व ‘वंदे मातरम्’ या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी सदस्यांच्या हातात विविध फलकदेखील होते.
मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीचा सोमवारी समारोप झाला. सकाळच्या सुमारास मंचचे राष्ट्रीय संयोजक इंद्रेश कुमार यांच्या नेतृत्वात आमदार निवासकडून ताजबाग दर्ग्याकडे सुमारे २०० सदस्य निघाले. तेथे ताजबाग ट्रस्ट समितीने मंचच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर हे सदस्य हेडगेवार भवन, संघ मुख्यालय व दीक्षाभूमी येथेदेखील गेले.
मदरशांमध्ये शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी पुढाकार
मदरशांमध्ये शिक्षणाचे आधुनिकीकरणासंदर्भातील प्रस्ताव बैठकीच्या अखेरच्या दिवशी संमत करण्यात आला. मदरशांमधील शिक्षणासंदर्भात त्रिसूत्रीय कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मदरशांचे आधुनिकीकरण झाले पाहिजे, धार्मिक शिक्षणासोबतच शालेय शिक्षणदेखील दिले गेले पाहिजे, विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित व व्यावहारिक शिक्षण दिले पाहिजे अशी मंचची भूमिका आहे. यासंदर्भात मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून पुढाकार घेण्यात येणार आहे.
मदरशांच्या संचालकांसाठी मंचातर्फे राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. यात सुमारे हजार संचालक सहभागी होतील, अशी माहिती इंद्रेश कुमार यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली. मुस्लिमांमध्ये शैक्षणिक जागृती यावी व महिला सशक्तीकरण व्हावे यासाठी ‘आधी रोटी खाएंगे, बच्चों को पढाएंगे’, ‘छोटा परिवार, सुखी परिवार’ इत्यादी घोषणांसोबत मोहीम चालविण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेमध्ये राजस्थान वक्फ बोर्डचे चेअरमन अबुबकर नकवी, मंचचे राष्ट्रीय संयोजक मो. अफजाल, गिरीश जोयाल, सेंट्रल वक्फ कौन्सिलचे सदस्य अब्बास अली बोहरा, ‘एएमयू’च्या न्यायालयाचे सदस्य डॉ. शाहीद अख्तर, उलेमा विभागाचे प्रमुख मौलाना मुजतबा, मंचचे राष्ट्रीय संघटन सहसचिव विराग पाचपोर व महाराष्ट्र प्रदेश संयोजक मो. फारुक शेख उपस्थित होते.(प्रतिनिधी)
‘लव्ह जिहाद’, ‘घरवापसी’ हे उन्मादच
४‘लव्ह जिहाद’ आणि ‘घरवापसी’ यासारख्या गोष्टी उन्मादातूनच निर्माण होतात. या विषयाला तापविणाऱ्या लोकांनी याऐवजी देशहितासाठी कार्य करायला हवे, असे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांचे मौनच योग्य उत्तर असते, असेदेखील इंद्रेश कुमार म्हणाले. मंचकडून मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासासंदर्भात कार्य करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु याच पार्श्वभूमीवर अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या अल्पसंख्यंक दर्जाबाबत मंचाची भूमिका काय आहे, याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. अल्पसंख्यकांच्या व्याख्येवरच त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांनी सोमवारी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात जाऊन डॉ.हेडगेवार यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी भारतमाता की जयचे नारे दिले.