भंते सुरेई ससाई ठणठणीत
By Admin | Updated: August 23, 2014 03:12 IST2014-08-23T03:12:49+5:302014-08-23T03:12:49+5:30
बौद्ध धम्मगुरू भंते सुरेई ससाई यांची प्रकृती आता ठणठणीत असून ते शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून नागपूरला परतले. विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

भंते सुरेई ससाई ठणठणीत
नागपूर : बौद्ध धम्मगुरू भंते सुरेई ससाई यांची प्रकृती आता ठणठणीत असून ते शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून नागपूरला परतले. विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
भंते सुरेई ससाई यांची प्रकृती मागील दोन महिन्यांपासून बरी नव्हती. महिनाभर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती थोडी सुधारल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ९ आॅगस्ट रोजी त्यांना मुंबईला नेण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास विमानाने नागपुरात आले. भंते धम्मबोधी, अमित गडपायले, विजय मेश्राम त्यांच्यासोबत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळाबाहेर पडताच विलास गजघाटे, देवाजी रंगारी, एस.के. गजभिये यांच्यासह शेकडोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. भंते ससाई यांनी विमानतळाबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विमानतळावरून ते थेट दीक्षाभूमीला गेले. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी त्यांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)