नागपूरचे अतिरिक्त आयुक्त भरणे यांना फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:23 IST2020-01-29T00:20:57+5:302020-01-29T00:23:10+5:30
येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांना रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी अहमदाबाद (गुजरात) ने फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी प्रदान केली.

नागपूरचे अतिरिक्त आयुक्त भरणे यांना फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांना रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी अहमदाबाद (गुजरात) ने फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी प्रदान केली. अहमदाबादमध्ये सोमवारी हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी ही देशातील एकमेव इंटर्नल सिक्युरिटी व नॅशनल पोलीस युनिव्हर्सिटी आहे.
हायप्रोफाईल केसेस, आर्थिक गुन्हे, व्हाईट कॉलर क्रिमिनलशी संबंधित संवेदनशील गुन्ह्यांचा तपास करताना फॉरेन्सिक सायकोलॉजीचा पुरेपूर फायदा होतो. क्लिष्ट गुन्ह्याचा गुंता सोडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफी, नार्को टेस्ट या सारखी टेक्निक्स याच युनिव्हर्सिटीने विकसित केल्या आहेत. ५ मे २०१० च्या श्रीमती सेल्फी वर्सेस स्टेट आॅफ कर्नाटका या जजमेंट नंतर पॉलीग्राफी करण्यास कोर्टा समक्ष परवानगी घ्यावी लागते. एक्सपर्ट इव्हिडन्स म्हणून फॉरेन्सिक एक्सपर्टचे मत कोर्टात ग्राह्य धरले जाते. फॉरेन्सिक सायकोलॉजी या विषयात पीएचडी केल्यामुळे तपासात भरणे यांनाच नव्हे तर पोलीस दलालाही त्याचा फायदा होणार आहे.
देशातच नव्हे तर विदेशातही गुजरात फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीचे नाव आहे. येथून पीएचडी मिळविण्यासाठी भरणे यांना पाच वर्षाचा कार्यकाळ लागला. त्यांनी डेहराडून, लखनौसह ठिकठिकाणच्या १०० गुन्ह्यांचा अभ्यास आपल्या शोधप्रबंधात जोडला. गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचे (जीएफएसयू) डॉ. मुकुंदन यांनी ब्रेन मॅपिंग टेक्निक ला अधिक विकसित केले. डॉ. मुकुंदन यांच्या गाईड डॉ. एस. एल. वाया होत्या. डॉ. वाया जीएफएसयूच्या संचालक आहेत. नीलेश भरणे यांनाही फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी मिळविण्यासाठी डॉ. वाया मार्गदर्शक (गाईड) म्हणून लाभल्या. तर, सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लेबॉरिटीज (सीबीआय) नवी दिल्लीच्या संचालक डॉ. आशा श्रीवास्तव यांनी को-गाईड म्हणून भरणे यांना मार्गदर्शन केले. फॉरेन्सिक सायकोलॉजी या विषयात पीएचडी करणारे देशात ते एकमेव आयपीएस अधिकारी आहेत. शनिवारी भरणे यांना रक्षा शक्ती युनिव्हर्सिटीकडून ही गोड बातमी मिळाली. त्यानंतर सोमवारी सकाळी भरणे अहमदाबादला पोहचले. तेथे प्रमाणपत्र आणि बुके देऊन डॉ. वाया यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी युनिव्हर्सिटीचे रजिस्टार डॉ. धर्मेश प्रजापती हजर होते. मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनीही पोलीस आयुक्तालयात त्यांना बुके देऊन त्यांचे अभिनंदन केले.