भागचंद्र जैन अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व
By Admin | Updated: June 29, 2015 03:00 IST2015-06-29T03:00:35+5:302015-06-29T03:00:35+5:30
जैन धर्म आणि साहित्य संपूर्ण जीवनदर्शन आहे. आदर्श व्यक्ती, आदर्श समाज आणि आदर्श राष्ट्र निर्माण करण्यासाठी जैन धर्म आणि जैन साहित्य मोलाचे मार्गदर्शन करतो.

भागचंद्र जैन अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व
मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया : पाली, प्राकृत आणि संस्कृतचे विद्वान प्रा. भागचंद्र जैन यांचा अमृतमहोत्सव
नागपूर : जैन धर्म आणि साहित्य संपूर्ण जीवनदर्शन आहे. आदर्श व्यक्ती, आदर्श समाज आणि आदर्श राष्ट्र निर्माण करण्यासाठी जैन धर्म आणि जैन साहित्य मोलाचे मार्गदर्शन करतो. जैन धर्मातील उपदेशांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉ. भागचंद्र जैन यांच्यासारख्या तपस्वीने जे साहित्य निर्माण केले, ते अतुलनीय आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांची आज समाजाला नितांत गरज आहे. त्यांचा केवळ जैन समाजालाच नव्हे तर सर्वांनाच अभिमान वाटतो, असे मत मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया यांनी व्यक्त केले. पाली, प्राकृत आणि संस्कृतचे प्रख्यात विद्वान, श्रमण संस्कृतिप्रज्ञ जैनरत्न प्रा. डॉ. भागचंद्र जैन यांच्या अमृतमहोत्सवी समारंभात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी डॉ. जैन यांच्या कार्यावर आधारित गौरव ग्रंथांचेही प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय दिगंबर जैन महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्मलकुमार सेठी, अमेरिकेच्या कोलेरॅडो युनिव्हर्सिटीचे संगणक वैज्ञानिक प्रो. यशवंत मलैया, कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, कराड, साताऱ्याचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, मध्य प्रदेशचे माजी आयएएस आणि जैन समाजाचे सदस्य सुरेशचंद्र जैन, सागर, मध्य प्रदेशचे ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक महेंद्रकुमार फुसकेले, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी उपस्थित होते. मंत्री जयंत मलैया म्हणाले, आपण येथे अतिथी म्हणून नव्हे तर या परिवाराचा सदस्य म्हणूनच उपस्थित आहोत. डॉ. भागचंद्र जैन माझे काका आहेत. ते मोठे विद्वान आहेत आणि त्यांचा सर्वांनाच गर्व वाटतो. मी येथे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित आहे.
खा. विजय दर्डा म्हणाले, विदर्भाच्या भूमीत प्राचीन काळापासून साहित्याची अमृतधारा वाहते आहे. काळ बदलला पण या भूमीची विद्वतेची परंपरा प्रा. भागचंद्र जैन यांच्यासारख्यांनी कायम ठेवली. भागचंद्र जैन यांचे नाव देशभरात बुद्धिवादी लोकांमध्ये सन्मानाने घेतले जाते. त्यांचे प्रेरणास्पद कार्य सामान्य लोकांपर्यंत आणि विशेषत्वाने संपूर्ण जैन समाजाच्या प्रत्येक सदस्यांपर्यंत पोहोचायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निर्मलकुमार सेठी म्हणाले, जैन समाजाला आपल्या पुरातन इतिहास आणि पुरातत्त्वीय माहिती कमी आहे. सध्या कम्बोडिया, व्हिएतनामसह दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये पुरातत्त्वीय शोधात जैन धर्माचे अनेक पुरावे प्रमाणासाहित सापडत आहेत. या प्राचीन परंपरेचे वर्णन क रणारी पत्रिका ‘प्राचीन जैन तीर्थ जीर्णोद्धार पत्रिका’ काढण्यात येत आहे. या पत्रिकेचे संपादन डॉ. भागचंद्र जैन मागील १२ वर्षांपासून समर्पित भावनेने करीत आहेत. मध्य प्रदेशमध्येही मोठ्या संख्येने जैन पुरातत्त्वीय सामग्री आहे. ती बाहेर काढण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया यांना उद्देशून व्यक्त केले. पान/२ वर
मतभेदांशिवाय समाज एकत्रित राहू शकतो
खा. विजय दर्डा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष निर्मलकुमार मोदी यांना व्यासपीठावर आवाहन करताना पंथभेद विसरून सर्व जैन समाजाने एकत्रित येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यामुळे जैन समाजाची शक्ती वाढेल. दिगंबर आणि श्वेतांबर दोघांकडूनही प्राचीन मूर्ती आणि पांडुलिपीत कुठलीही छेडछाड करण्यात येऊ नये. खा. विजय दर्डा यांच्या आवाहनाबाबत बोलताना सेठी यांनीही खा. दर्डा यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. यासंदर्भात एक समन्वय समिती तयार करून काम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या समितीची दर तीन महिन्यात बैठक व्हावी आणि ज्या मुद्यांवर जैन समाजाचे एकमत आहे त्या मुद्यांवर संपूर्ण जैन समाज एकत्रित समोर जाऊ शकतो, असे ते म्हणाले.