भदंत सदानंद हे बाबासाहेबांना अपेक्षित भिक्षू

By Admin | Updated: November 8, 2014 02:47 IST2014-11-08T02:47:37+5:302014-11-08T02:47:37+5:30

तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध भिक्षू कसे असावे यासंबंधात काही संकल्पना मांडल्या होत्या.

Bhadant Sadanand is the monk expected to be Babasaheb | भदंत सदानंद हे बाबासाहेबांना अपेक्षित भिक्षू

भदंत सदानंद हे बाबासाहेबांना अपेक्षित भिक्षू

नागपूर : तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध भिक्षू कसे असावे यासंबंधात काही संकल्पना मांडल्या होत्या. बौद्ध भिक्षू संबंधात त्यांच्या काही अपेक्षा होत्या. अखिल भारतीय भिक्षू संघाचे संघानुशासक असलेले भदंत सदानंद महाथेरो हे खऱ्या अर्थाने तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेले बौद्ध भिक्षू आहेत, या शब्दांमध्ये भदंत सदानंद महाथेरो यांचा उपस्थित वक्त्यांनी गौरव केला.
आवाज इंडिया टीव्ही आणि अनाथपिंडक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भदंत सदानंद महास्थवीर सद्धमादित्य यांचा ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह उरुवेला कॉलनी वर्धा रोड येथे नागरी सत्कार करण्यात आला. भदंत बोधीपालो महाथेरो हे अध्यक्षस्थानी होते.
भदंत राहुलबोधी, नासुप्रचे सभापती डॉ.हर्षदीप कांबळे, बौद्ध-आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव पूरण मेश्राम, अनाथपिंडक परिवाराचे संस्थापक पी.एस. खोब्रागडे, आवाज इंडिया टीव्हीचे संचालक अमन कांबळे, प्रसिद्ध कॉस्मेटिक तज्ज्ञ डॉ. सुरेश चौरे प्रमुख अतिथी होते.
यावेळी बोलताना पूरण मेश्राम म्हणाले, भदंत सदानंद महाथेरो यांनी आपले संपूर्ण आयुष्य बौद्ध धम्म चळवळीत समर्पित केले. ही एक ऐतिहासिक अशी घटना आहे. गौतम बुद्धांनी भिक्खू संघ आणि भिक्षू कसे आदर्श राहतील, याची संकल्पना मांडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बौद्ध भिक्षू कसे असावेत, यासंबंधात अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्या अपेक्षांवर भदंत सदानंद महाथेरो हे खऱ्या अर्थाने पूर्ण उतरतात. तन-मन-धनाने ज्या बौद्ध भिक्षूंनी आयुष्यभर धम्माची सेवा केली त्या भिक्षूंसोबत आपण कसे वागलो, याचे चिंतन करण्यात यावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.
पी.एस. खोब्रागडे यांनी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात केलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीनंतर बौद्ध संस्कृतीच्या पुनरुज्जीवनानंतर जी बौद्ध भिक्षूंची परंपरा भारतात आली, त्या परंपरेतील भदंत सदानंद महाथेरो हे ज्येष्ठ भिक्षू आहेत. दलाई लामा, भदंत आनंद कौसल्यायन, भदंत डॉ. जगदीश कश्यप, महापंडित राहुल सांकृत्यायन, भदंत मेटिवल संघरत्न, भदंत डी. शासनश्री यांचा समृद्ध वारसा भंते सदानंद महाथेरो यांना लाभला आहे.
डॉ. भाऊ लोखंडे म्हणाले, भदंत सदानंद महाथेरो हे जनतेचे मित्र, सेवक आणि मार्गदर्शक म्हणून बौद्ध जगाला परिचित आहेत. आपल्या धम्म प्रचार, प्रसार कार्यात त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन तसेच महान बौद्ध साहित्याचा पाली भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करून एक ऐतिहासिक कार्य केले आहे. डॉ. चौरे, भदंत बोधिपालो यांनी सुद्धा त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. राजेंद्र फुले यांनी संचालन केले. भदंत मेत्तानंद यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

Web Title: Bhadant Sadanand is the monk expected to be Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.