भदंतला १० वर्षे सश्रम कारावास
By Admin | Updated: November 10, 2015 03:45 IST2015-11-10T03:45:41+5:302015-11-10T03:45:41+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा जिल्ह्यातील हत्याप्रकरणात आरोपी भदंतला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी चंद्रमणीनगर, नागपूर येथील रहिवासी आहे.

भदंतला १० वर्षे सश्रम कारावास
हायकोर्ट : भंडारा जिल्ह्यातील हत्याप्रकरण
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा जिल्ह्यातील हत्याप्रकरणात आरोपी भदंतला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी चंद्रमणीनगर, नागपूर येथील रहिवासी आहे.
कैलाश बाबुराव गावंडे (४९) असे आरोपीचे नाव असून भदंत झाल्यानंतर त्याचे नाव धम्मानंद ठेवण्यात आले. मृताचे नाव कोल्हू सीतारू चहांदे होते. तो ढोलसर येथे रहात होता. २१ फेब्रुवारी २००७ रोजी आरोपी हा चहांदेच्या घरी मुक्कामाने गेला होता. मध्यरात्रीनंतर वाद झाल्यामुळे आरोपीने चहांदेची लोखंडी रॉडने मारून हत्या केली. चहांदेला वाचवायला आलेली त्याची पत्नी आनंदाबाईलाही आरोपीने जखमी केले होते.
२८ एप्रिल २००९ रोजी भंडारा सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या आदेशाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीला भादंविच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-१ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवले व जन्मठेप रद्द करून १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायालयाचा अन्य आदेश कायम ठेवला. उच्च न्यायालयाने हा निवाडा देताना आरोपीचा हत्या करण्याचा उद्देश नव्हता असा निष्कर्ष नोंदविला आहे. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने ११ साक्षीदार तपासले होते. लाखांदूर पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता.(प्रतिनिधी)