अभाविपचा विद्यापीठावर ‘हल्लाबोल’

By Admin | Updated: September 28, 2016 03:11 IST2016-09-28T03:11:56+5:302016-09-28T03:11:56+5:30

शिष्यवृत्ती तसेच महाविद्यालयांच्या दर्जासंदर्भात सकारात्मक पावले उचलली नाही, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उपराजधानीत पाय ठेवू देणार नाही,

'Bhabhaibol' on ABVP University | अभाविपचा विद्यापीठावर ‘हल्लाबोल’

अभाविपचा विद्यापीठावर ‘हल्लाबोल’

राज्य शासनाला घरचा अहेर : शिक्षणमंत्र्यांना नागपुरात पाय ठेवू न देण्याचा इशारा
नागपूर : शिष्यवृत्ती तसेच महाविद्यालयांच्या दर्जासंदर्भात सकारात्मक पावले उचलली नाही, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उपराजधानीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्यात भाजपा आघाडीची सत्ता असूनदेखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ‘अभाविप’ने काढलेला मोर्चा हा शासनाला घरचा अहेरच मानण्यात येत आहे.
‘अभाविप’च्या विदर्भ प्रांतातर्फे विविध प्रकारच्या ५२ मागण्यांसंदर्भात धडक मोर्चा काढण्यात आला. यात पुनर्मूल्यांकन तसेच निकालांना होणारा उशीर, महाविद्यालयांची मनमानी, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अतिरिक्त शुल्क इत्यादींसंदर्भात त्यांच्या मागण्या होत्या. सीताबर्डी येथील ‘अभाविप’ कार्यालयाजवळून दुपारी १२ च्या सुमारास हा मोर्चा निघाला. सुरुवातीला मोर्चात एक ते दीड हजार कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी होते. परंतु नागपूर विद्यापीठाजवळ मोर्चा येईपर्यंत ही संख्या चार हजारांच्या जवळपास झाली होती. नागपुरासोबतच आजूबाजूच्या जिल्ह्यांतूनदेखील कार्यकर्ते पोहोचले होते. कार्यकर्ते शासन व विद्यापीठविरोधी घोषणा देत होते. या आंदोलनामुळे नागपूर विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘अभाविप’च्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरण मेश्राम, परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी हेदेखील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या काही मागण्या अगदी रास्तच आहेत व त्याबाबत नागपूर विद्यापीठदेखील सकारात्मक आहे.
परंतु काही मागण्या या राज्य शासनाच्या अखत्यारित येतात. त्याबाबत विद्यापीठ काहीही करू शकत नाही, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले. ५२ पैकी ४५ मागण्या मान्य करण्यात येतील, असे लेखी आश्वासन कुलगुरूंनी यावेळी दिले. ‘अभाविप’चे प्रांत उपाध्यक्ष प्रा.चंद्रकांत रागीट, विदर्भ प्रांत संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, प्रांत सहमंत्री गौरव हरडे, महानगर मंत्री रवी दांडगे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.(प्रतिनिधी)

धोधो पावसातही ठिय्या
विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाल्यावर लगेच जोरदार पाऊस आला. परंतु मुसळधार पावसातदेखील विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडलाच होता. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. सुमारे २० मिनिटे हजारो विद्यार्थी पावसात भिजले. यादरम्यान, त्यांची नारेबाजी सुरूच होती.
कडेकोट सुरक्षाव्यवस्था, विद्यापीठाची छावणी
विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर एकाच वेळी हजारो विद्यार्थी जमा होणार असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. सर्व आंदोलनकारी विद्यार्थ्यांना शासकीय विज्ञान संस्था ते विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयाच्या चौकापर्यंत ठिय्या आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दुसरीकडे विद्यापीठाचे सर्व प्रवेशद्वार तसेच कार्यालयातील दरवाजेदेखील बंद करण्यात आले होते. दिवसभर विद्यापीठाची अक्षरश: छावणी झाली होती. कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने सुरक्षायंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मोर्चा की ‘पिकनिक’ ?
‘अभाविप’च्या मोर्चात सहभागी झालेले अनेक जण कार्यकर्ते नव्हे तर केवळ विद्यार्थी होते. मोर्चा नेमका कशासाठी आहे हे आम्हाला माहीत नाही, केवळ नागपूर विद्यापीठाच्या विरोधात आहे, हे माहिती असल्याचे काहींनी सांगितले. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोर्चास्थळावर ‘सेल्फी’ घेताना दिसून आले. तर काही जण मोर्चा सोडून हास्यविनोदात रंगले होते.
वाहतुकीला फटका
सीताबर्डीहून निघालेला हा मोर्चा मुंजे चौक, व्हेरायटी चौक, महाराजबाग या मार्गाने विद्यापीठात आला. यावेळी वाहतुकीला फटका बसला. मोर्च्यामुळे एका बाजूचा अर्धा मार्गच व्यापला असला तरी या परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
शाळकरी मुलांची उपस्थिती
‘धडक मोर्चा’त १० हजार कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित राहतील, असा दावा ‘अभाविप’तर्फे करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात चार हजारांच्या आसपासच आंदोलनकर्ते एकत्र येऊ शकले. संख्या वाढावी यासाठी नागपूर बाहेरूनदेखील विद्यार्थी आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे मोर्चेकऱ्यांमध्ये चक्क काही शालेय विद्यार्थीदेखील दिसून आले.

Web Title: 'Bhabhaibol' on ABVP University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.