खबरदार! रस्त्यावर थुंकाल...लघुशंका कराल तर...:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:11 IST2020-02-21T23:09:43+5:302020-02-21T23:11:35+5:30
महापालिकेच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस) ने शुक्रवारी आसीनगर झोन परिसरात धडक कारवाई करीत अस्वच्छता पसरविताना दिसलेल्या ३६ लोकांकडून ५७०० रुपये दंड वसूल केला.

खबरदार! रस्त्यावर थुंकाल...लघुशंका कराल तर...:
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक स्थळी, चौकात आणि फूटपाथवर खर्रा खाऊन थुंकणे, रस्त्यावर लघुशंका करणे काही लोकांना चांगलेच महागात पडत आहे. महापालिकेच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस) ने शुक्रवारी आसीनगर झोन परिसरात धडक कारवाई करीत अस्वच्छता पसरविताना दिसलेल्या ३६ लोकांकडून ५७०० रुपये दंड वसूल केला.
एनडीएस प्रमुख वीरसेन तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी आसीनगर झोन परिसरात धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये ट्रॅफिक सिग्नलवर खर्रा खाऊन थुंकणे, खऱ्र्याची पन्नी फेकणे, कचरा टाकणे आणि रस्त्यावर लघुशंका करणारे एनडीएसच्या रडावर होते. या कारवाईमध्ये सार्वजनिक स्थळ, फूटपाथ आणि चौकात थुंकताना सापडलेल्या १७ लोकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ३४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय कचरा फेकताना, घाण पसरविताना आढळलेल्या १८ लोकांकडून १८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर लघुशंका करताना एक इसम आढळला, त्याच्याकडूनही ५०० रुपये दंड वसूल केल्याची माहिती तांबे यांनी दिली. ही धडक कारवाई यापुढेही शहरातील विविध भागात सुरू राहणार असून अशाप्रकारे घाण पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.