खबरदार, यापुढे वंदे भारत ट्रेनवर दगडफेक कराल तर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2023 20:47 IST2023-01-24T20:46:46+5:302023-01-24T20:47:45+5:30
Nagpur News आता वंदे भारतच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. यानंतर दगडफेक झाली तर त्या समाजकंटकावर रेल्वेच्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने समाजकंटकांना दिला आहे.

खबरदार, यापुढे वंदे भारत ट्रेनवर दगडफेक कराल तर...
नागपूर : दगडफेक करणाऱ्या १८ समाजकंटकांवर कारवाई करूनही वंदे भारत ट्रेनवर अधूनमधून दगडफेकीच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन चिंतित झाले आहे. परिणामी, आता वंदे भारतच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. यानंतर दगडफेक झाली तर त्या समाजकंटकावर रेल्वेच्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने समाजकंटकांना दिला आहे.
दिल्ली-वाराणसी, दिल्ली-कटरा, मुंबई-गांधीनगर कॅपिटल, दिल्ली-अम्ब अंदोरा, चेन्नई-म्हैसूर आणि नागपूर-बिलासपूर अशा सहा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. पूर्णत: स्वदेशी बनावटीच्या वंदे भारतमध्ये प्रवाशांसाठी अनेक सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सहाही रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
परंतु काही समाजकंटक वेगवेगळ्या मार्गावर अधूनमधून या गाडीवर दगडफेक करून नुकसान करीत आहेत. काही ठिकाणी दगडफेकीमुळे प्रवासी जखमी झाल्याचीही माहिती आहे. गेल्या महिन्यात नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारतवर छत्तीसगडमधील भिलाई दुर्गजवळ दगडफेकीची घटना घडली होती. रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असतानाच पुन्हा काही दिवसांपूर्वी दुसऱ्या एका ठिकाणी अशीच घटना घडली. या दगडफेकीत एक मुलगी जखमी झाल्याचे छायाचित्रही सर्वत्र व्हायरल झाले. रेल्वे सुरक्षा दलाने आतापर्यंत १८ जणांवर कारवाई केलेली आहे. यापुढे आणखी कडक कारवाईचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला असून नागपूर बिलासपूर मार्गावर रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या देखरेखीत विशेष सुरक्षा पथके निर्माण करण्यात आली आहेत.
रेल्वे पेरत आहे खबरे
हा प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांचे समुपदेशन व जनजागरण केले जात आहे. दगडफेक करणाऱ्या समाजकंटक कोण आहे हे माहीत होण्यासाठी रेल्वेने खबरे पेरणे सुरू केले आहे. यासाठी रेल्वेलाइन शेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांचे समुपदेशन केले जात आहे.
...