फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:07 AM2021-05-19T04:07:40+5:302021-05-19T04:07:40+5:30

नागपूर : सायबर क्राईममध्ये सर्वांत जास्त गुन्ह्यांची संख्या फेसबुकवरून घडल्याचे उघड होत आहे. गरज नसताना कळत नकळत आपण स्वतःच ...

Beware if money is demanded from Facebook! | फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान!

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान!

Next

नागपूर : सायबर क्राईममध्ये सर्वांत जास्त गुन्ह्यांची संख्या फेसबुकवरून घडल्याचे उघड होत आहे. गरज नसताना कळत नकळत आपण स्वतःच या गुन्ह्यांची संख्या वाढवत असल्याचेही वास्तव त्यातून अधोरेखित होत आहे.

फेसबुकच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचा फंडा अतिशय सोपा आहे. त्यामुळे तुम्हाला जर फेसबुकवरून पैशांची मागणी होत असेल तर सावधान!

सायबर गुन्हेगार तुमच्याच नावाची फेक फेसबुक प्रोफाईल तयार करतात. तुमचा फोटो आणि नाव वापरून तुमच्या फ्रेण्डलिस्टमध्ये ते कॉमन मेसेज पाठवितात. अल्पावधीसाठी मोठ्या रकमेची अत्यंत आवश्यकता आहे. आलेली अडचण सांगू शकत नाही. असे सांगून ते अकाउंट नंबर देतात अन् त्यात रक्कम जमा करण्यास सांगतात. जवळचा मित्र आर्थिक अडचणीत असल्याचे मानून अनेक जण शहानिशा न करता किंवा त्या मित्राला एक फोन करून खात्री करून न घेताच जमेल तेवढी रक्कम त्या बँक खात्यात जमा करतात. नंतर मात्र मित्राशी जेव्हा संपर्क होतो, त्यावेळी आपण फसवलो गेलो, हे उघड होते.

---

परिचयातील व्यक्तीचे नाव

गेल्या आठवड्यात शहरातील सुपरिचित डॉ. अविनाश गावंडे यांचे असेच बनावट फेसबुक अकाउंट तयार करून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मित्रांकडून रक्कम हडपण्याचा प्रयत्न केला.

एका व्यावसायिकाबाबतही असाच प्रकार घडला. अर्थात सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर करतात.

---

दुसरा फंडा

आकर्षक फोटो लावून फेक प्रोफाईल तयार केल्यानंतर सायबर गुन्हेगार शेकडो जणांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवतात. शंभरातील दहा, वीस जण ती स्वीकारतात अन्‌ फेसबुकवरून महिला-पुरुषांची मैत्री सुरू होते. नंतर सलग संपर्कातून विश्वास संपादन केल्यानंतर गिफ्ट पाठवायचे असे सांगतात. नंतर ते गिफ्ट दिल्ली, मुंबईच्या विमानतळावर आल्याचा संबंधिताला फोन, मेसेज किंवा मेलही येतो. त्यानंतर विमानतळावरून कस्टम अधिकारी बोलतो, असे सांगणारे भामटे फोन करतात. कस्टम ड्युटी भरावी लागेल, असे सांगितले जाते. लाखोंच्या गिफ्टच्या आमिषात प्रारंभी काही हजार रुपये भरण्यास बाध्य करून सायबर गुन्हेगार नंतर वेगवेगळ्या नावाखाली रक्कम उकळतात. भरपूर रक्कम जमा करूनही गिफ्ट मिळतच नाही.

---

पाच हजारांवर तक्रारी

सायबर गुन्ह्यांच्या वर्षभरात पाच हजारांवर तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. या तक्रारींचे स्वरूप वेगवेगळे आहे. मात्र, फेसबुकवरून अशाप्रकारे रक्कम उकळून फसवणूक केल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात आहेत.

---

सतर्कता उत्तम उपाय

सायबर गुन्हेगारीवर सतर्कता हाच उत्तम उपाय आहे. त्यामुळे फेसबुकवर कुण्या अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करण्याचे टाळा. फेसबुकवर कुणी गिफ्ट पाठवल्याची थाप मारत असेल तर त्याला अजिबात प्रतिसाद देऊ नका. आपला मित्र फेसबुकवर पैशांची मागणी करत असेल तर त्याला फोन करून, प्रत्यक्ष भेटून विचारणा करा. ही सतर्कता बाळगली तर फसवणूक होणार नाही.

-डॉ. अशोक बागुल

वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

सायबर पोलीस स्टेशन, नागपूर

---

Web Title: Beware if money is demanded from Facebook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.