खोट्या आश्वासनांपासून सावध राहा

By Admin | Updated: October 11, 2014 02:52 IST2014-10-11T02:52:32+5:302014-10-11T02:52:32+5:30

भाजपाने चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखवून दिल्लीची सत्ता हस्तगत केली. परंतु अद्याप त्या दिशेने सरकारने कुठलेही पाऊल उचलले नाही.

Beware of false assurances | खोट्या आश्वासनांपासून सावध राहा

खोट्या आश्वासनांपासून सावध राहा

नागपूर/भंडारा : भाजपाने चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखवून दिल्लीची सत्ता हस्तगत केली. परंतु अद्याप त्या दिशेने सरकारने कुठलेही पाऊल उचलले नाही. आता महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला खोटी आश्वासने देत महाराष्ट्रभर फिरत आहेत. तेव्हा खोटी आश्वासने देणाऱ्यांपासून सावध राहा, असा इशारा बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आज येथे दिला. काँग्रेस-भाजपाने आजवर निवडणुकीदरम्यान कित्येक आश्वासने दिली आहेत. परंतु त्यातील किती आश्वासने आजवर पूर्ण केलीत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
भंडारा विधानसभा क्षेत्राच्या बसपाचे उमेदवार देवांगणा विजय गाढवे यांच्या प्रचारार्थ दसरा मैदानावर तर नागपुरातील बसपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कस्तूरचंद पार्कवर आयोजित जाहीर सभेला त्या मार्गदर्शन करीत होत्या. बसपाचे ज्येष्ठ नेते सतीशचंद्र, खा. वीरसिंह, डॉ. सुरेश माने, कृष्णा बेले आणि बसपाचे उमेदवार किशोर गजभिये (उत्तर नागपूर), सत्यभामा लोखंडे (दक्षिण नागपूर) आणि राजेन्द्र पडोळे (दक्षिण- पश्चिम नागपूर) आदींसह सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.
मायावती पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतर या देशात काँग्रेस व भाजपाच्या हातात सत्ता राहिली आहे. स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही या देशातील दलित, शोषित, मजूर गरीबांच्या जीवनात फारसा फरक पडलेला नाही. त्यांची साामजिक व आर्थिक परिस्थिती हलाखीचीच आहे. गरिबी आणि दारिद्र्यातच जीवन जगत आहेत. याला या देशातील सत्ताधारी लोकचं जबाबदार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील समाजबांधवांना संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाची सुविधा दिली होती. त्याच्या आधारावर हा समाज आपली प्रगती करीत आहे, परंतु हे आरक्षण हळूहळू संपविण्याचे कारस्थान सध्या देशात सुरू आहे. काँग्रेस-भाजपासह सर्वच राजकीय पक्ष हे धनाढ्य व उद्योगपतींच्या मदतीने सरकार स्थापन करीत असतात त्यामुळे सत्तेत आल्यावर ते सामान्यजनांचा विकास कसा करणार? केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, केवळ मूठभर श्रीमंत लोकांच्याच विकासाचे धोरण राबवित असून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच महागाई वाढत असल्याची जाहीर टीकासुद्धा त्यांनी यावेळी केली. मायावती यांनी यावेळी रिपाइं नेत्यांवरही नाव न घेता प्रहार केला. (प्रतिनिधी)

Web Title: Beware of false assurances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.