सावधान...! फेसबुक फ्रेण्ड हेरगिरी करवून घेऊ शकतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:27 AM2018-10-05T10:27:12+5:302018-10-05T10:29:04+5:30

सावधान...! फेसबुकवर खूप जास्त अ‍ॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेने पेरलेल्या व्यक्तीकडून टार्गेट केले जाऊ शकता. असे झाले तर तुम्हाला हेरगिरीच्या आरोपात अटकही होऊ शकते.

Beware ...! Facebook fan can spy on! | सावधान...! फेसबुक फ्रेण्ड हेरगिरी करवून घेऊ शकतो!

सावधान...! फेसबुक फ्रेण्ड हेरगिरी करवून घेऊ शकतो!

Next
ठळक मुद्देपाकिस्तानी गुप्तचर संस्था सक्रिय अनेकांवर प्रयोग, धक्कादायक खुलासा

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सावधान...! फेसबुकवर खूप जास्त अ‍ॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेने पेरलेल्या व्यक्तीकडून टार्गेट केले जाऊ शकता. असे झाले तर तुम्हाला हेरगिरीच्या आरोपात अटकही होऊ शकते. होय, हे खरे आहे. भारताच्या उण्यावर असलेल्या पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयकडून हा प्रयोग केला जात आहे. अशाप्रकारे भारतातील काही जणांना आयएसआयने आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा बेमालूमपणे गैरवापर केल्याचेही पुढे आले आहे.
सोशल मीडियाने तरुणाईच नव्हे तर सर्वच वयोगटातील मंडळीला सध्या वेड लावले आहे. ज्याचे प्रत्यक्षात कधी तोंड बघितले नाही आणि ज्याला भविष्यात प्रत्यक्ष कधी भेटण्याची शक्यताही नाही, अशी मंडळीच्याही अनेक जण जीवश्च कंठश्च मित्र असल्यासारखे रोज संपर्कात राहतात. केवळ चेहऱ्यावर भाळून त्याच्यासोबत तासन्तास चॅटिंग करताना माहितीचेही आदानप्रदान केले जाते. फेसबुकने हे घडवून आणले आहे.
थोडा चांगला फेस अन् प्रोफाईल दिसताच फेसबुकवर फ्रेण्ड बनविण्यासाठी रिक्वेस्ट येतात अन् अनेक जण अ‍ॅड फ्रेण्ड करीत त्यांना रिक्वेस्टही पाठवीत असतात. फेसबुकची चलती बघून शत्रू देशाच्या गुप्तचर संस्थांनीही हेरगिरीचे कलुषित मनसुबे बाळगून विशिष्ट जणांना टार्गेट करणे सुरू केले आहे. आकर्षक चेहरा अन् प्रभावी प्रोफाईल (फेक आयडी) अपलोड करून संबंधित व्यक्तीला (तरुण-तरुणीला) सहजपणे अ‍ॅड फ्रेण्ड करणाऱ्याला ‘तुमची फे्रण्ड रिक्वेस्ट मान्य’ झाल्याचा मेसेज येतो, नंतर सुरू होतो नियमित चॅटिंगचा सिलसिला. पेरलेला मित्र चॅटिंगच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला आपल्या आॅनलाईन जाळ्यात गुंतवतो आणि त्याच्याकडून नियमित पाहिजे ती संवेदनशील माहिती बेमालूमपणे काढूनही घेतो. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयची पद्धत आहे. बनावट नावाने फेसबुक आयडी तयार करून लष्करात काम करणाऱ्या अच्युतानंद नामक जवानाला फेसबुकच्या माध्यमातून अशाच पद्धतीने एका व्यक्तीने आपल्या जाळ्यात ओढले. आयएसआयने पेरलेल्या या फेसबुक फ्रेण्डने जवानाकडून संवेदनशील माहिती काढून घेण्याचे प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे.
तपास यंत्रणेला या धक्कादायक प्रकाराची कुणकुण लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी गेल्या बुधवारी अच्युतानंदला नोएडातून ताब्यात घेतले. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. आयएसआयने केवळ अच्युतानंदच नव्हे तर अनेकांवर हा प्रयोग केल्याची शंका असून, राजस्थानमधील एका तरुणाचेही नाव असेच पुढे आल्याचे समजते. अनोळखी मित्राला प्रभावित करण्याच्या नादात किंवा सहज म्हणून ही भयंकर चूक होऊ शकते.
अलीकडे प्रत्येकच जणाला विदेशी मित्रांकडून (अन् मैत्रिणींकडूनही!) फ्रेण्ड रिक्वेस्ट येण्याचे प्रमाण वाढले आहे. संवेदनशील पदावर काम करणाऱ्या, तपास यंत्रणा, सामाजिक संस्था-संघटना तसेच मीडियात कार्यरत असणाऱ्यांना नवनवीन विदेशी मित्रांची महिन्याला हमखास फ्रेण्ड रिक्वेस्ट येते. त्यामुळे फेसबुक फ्रेण्ड जोडताना किंवा जोडले असल्यास त्याच्याशी आॅनलाईन गप्पा (मेसेज) करताना सतर्कता बाळगण्याची गरज आहे. नाही तर हेरगिरीसारखा मोठा गुन्हा आपल्याकडून घडू शकतो.

हे धोके हमखास आहेत!
हेरगिरी करवून घेण्याचा प्रयोग सर्वांच्या बाबतीत शक्य नसला तरी आपली अमूक देशात मोठी संपत्ती आहे. आपल्याला भारतात सेटल व्हायचे आहे. ही संपत्ती गोरगरीब, अनाथालय किंवा सामाजिक संस्था-संघटनांना दान करायची आहे. त्यासाठी तुमची मदत हवी आहे, असे सांगून किंवा मैत्रीखातर महागडे गिफ्ट पाठवायचे आहे, असे सांगून फसवणूक करण्याचा धोका जास्त आहे. आपण अमूक एका देशातून भारतात (दिल्ली, मुंबई विमानतळावर) आलो. येथील कस्टम अधिकाऱ्यांनी आपल्याजवळ असलेले कोट्यवधींचे हिरे, सोने ताब्यात घेतले. ते सोडविण्यासाठी विशिष्ट रक्कम (शुल्क) कस्टम अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहे, असे सांगून विदेशी फेसबुक फ्रेण्ड विशिष्ट खात्यात रक्कम जमा करायला लावतो. नागपुरात वकील, प्राध्यापकांसह गेल्या वर्षभरात अशाप्रकारे अनेकांची फसवणूक झाली आहे. बोर दाखवून आवळा काढण्याचे हे धोके विदेशी फेसबुक फ्रेण्डकडून हमखास होऊ शकतात. त्यामुळे सावधान!

Web Title: Beware ...! Facebook fan can spy on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.