पोषण आहाराचा दोन लाख विद्यार्थ्यांना लाभ
By Admin | Updated: October 19, 2014 00:57 IST2014-10-19T00:57:39+5:302014-10-19T00:57:39+5:30
प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थिती वाढावी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना प्रभावीपणे राबविली जाते.

पोषण आहाराचा दोन लाख विद्यार्थ्यांना लाभ
जिल्हा परिषद : २६ कोटींचे अनुदान वाटप
नागपूर : प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थिती वाढावी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना प्रभावीपणे राबविली जाते. गेल्या वर्षात जिल्ह्यातील १,९०,००० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. यासाठी २६ कोटींचे अनुदान वाटप करण्यात आले.
केंद्र व राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप केले जाते. मागील वर्षात जिल्हा परिषदेच्या १५८० व अनुदानित खासगी ३६९ शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. ही योजना अधिक सक्षमतेने राबविली जावी. यासाठी योजनेतील त्रुटी, अडचणी व उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या योजनेचा उद्देश सफल व्हावा, यासाठी तांदूळ व इतर साधनसामग्रीच्या साह्याने भिन्न प्रकारचे मेनू तयार केले जातात. शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना योजनेचा लाभ मिळावा, या दृष्टीने पोषण आहार विभागाने पुढील वर्षाचे नियोजन केले आहे. परिसरात उपलब्ध भाजीपाला व इतर बाबी लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर आहारात आवश्यक बदल करून विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल अशा स्वरूपाचा मेनू दिला जातो.
सोबतच आहारातून आवश्यक ती प्रथिने व उष्मांक मिळतील याची खबरदारी घेतली जाते. पोषण आहारासाठी लागणारे इंधन व भाजीपाला पुरविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर होती. आता ती महिला बचत गटांवर सोपविण्यात आल्याची माहिती पोषण आहार विभागाचे जिल्हा निरीक्षक नीलेश वाघमारे यांनी दिली.(प्रतिनिधी)