विश्वासातील व्यक्तीने केला विश्वासघात
By Admin | Updated: June 24, 2017 02:42 IST2017-06-24T02:42:39+5:302017-06-24T02:42:39+5:30
विश्वासातील व्यक्तीने कटकारस्थान रचून बनावट कागदपत्राद्वारे एका व्यक्तीचे घर बँकेत गहाण ठेवले.

विश्वासातील व्यक्तीने केला विश्वासघात
कटकारस्थान रचले : गहाणपत्राऐवजी बनविले घराचे विक्रीपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्वासातील व्यक्तीने कटकारस्थान रचून बनावट कागदपत्राद्वारे एका व्यक्तीचे घर बँकेत गहाण ठेवले. हा गैरप्रकार उघड होऊनही पोलिसांनी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला. मात्र, वरिष्ठांकडे हा गैरप्रकार गेल्यानंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपी गौरव ऊर्फ सूरज अरविंद ठाकरे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
गौरव ऊर्फ सूरज अरविंद ठाकरे (वय ४०, रा. श्रध्दा अपार्टमेंट मनीषनगर), विष्णू राधेलाल शर्मा (वय ५०) आणि अनिता विष्णू शर्मा (वय ४५, रा. बंगला क्र. ४४, कामठी रोड, नागपूर) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
आरोपी ठाकरे आणि विठ्ठलराव गोमासे यांचे घरोब्याचे संबंध होते. पैशाची चणचण असल्यामुळे गोमासे यांनी ठाकरेच्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आरोपी ठाकरेने आपल्या साथीदारांच्या साहाय्याने मदतीचा भास निर्माण केला. गृहकर्जासाठी गोमासे यांचे श्रीनाथ साईनगर ओंकारनगरातील घराचे गहाणपत्राऐवजी विक्रीपत्र तयार केले. ते नागपूर सहकारी बँकेत जमा केले. या विक्रीपत्राची बनावट प्रत तयार करून आयसीआयसी बँकेतून कर्ज घेण्यासाठी त्याचा गैरवापर केला. एवढेच नव्हे तर चेक वटविण्यासाठी दुसऱ्या एका बँकेत खाते उघडून तेथेही गोमासेंच्या नावे बनावट कागदपत्रांचा वापर केला. त्याआधारे तीन टप्प्यात धनादेशाच्या माध्यमातून १३ लाख १३ हजार ५७६ रुपये काढून घेतले. २९ नोव्हेंबर २००६ ते ६ डिसेंबर २००६ दरम्यान ही बनवाबनवी झाली.
पोलिसांकडूनही मनस्ताप
विठ्ठलराव यांचा मुलगा श्याम गोमासे यांनी या प्रकरणात तक्रार नोंदवण्यासाठी सक्करदरा पोलिसांकडे अनेकदा येरझारा घातल्या. मात्र, आरोपींनी पोलिसांशी संधान साधून पीडित परिवारालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोन दिवसांपूर्वी हे प्रकरण पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांच्याकडे गेले. त्यांनी सक्करदरा पोलिसांना जाब विचारल्यानंतर गुरुवारी रात्री या प्रकरणात पोलिसांनी ठाकरे आणि शर्मा दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.