बेलसरे, भारंबेवर निवडणुकीचा भार

By Admin | Updated: March 12, 2015 02:47 IST2015-03-12T02:47:01+5:302015-03-12T02:47:01+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी आॅगस्टनंतर निवडणूका होणार आहेत.

Belasre, the burden of weightlifting elections | बेलसरे, भारंबेवर निवडणुकीचा भार

बेलसरे, भारंबेवर निवडणुकीचा भार

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी आॅगस्टनंतर निवडणूका होणार आहेत. यासाठी सहाय्यक म्हणून विद्यापीठातील लोकांना संधी न देता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची तात्पुरती सेवा घेण्यात येणार आहे. विद्यापीठात अधिकारी असतानादेखील बाहेरील व्यक्तींची नियुक्ती करण्यामागे नेमका उद्देश काय आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विकासकामांसाठी कंपन्यांकडे दान मागणाऱ्या विद्यापीठाकडून ‘आऊटसोर्स’ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ च्या कलम ४२(१) नुसार ३१ आॅगस्ट रोजी विविध प्राधिकरणांच्या सदस्यांचा कालावधी संपुष्टात येणार आहे. अधिनियमातील ४२(२) च्या तरतुदींनुसार यानंतर निवडणुका घेणे आवश्यक असून त्याचा कार्यक्रम जाहीर करणे गरजेचे आहे. निवडणुकांचे काम सुरळीतपणे पार पाडावे याकरिता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत विशेष निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकांचे निर्णय अधिकारी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव व सहायक निर्णय अधिकारी म्हणून उपकुलसचिव (सा.प्र.) व उपकुलसचिव (विद्या शाखा) हे काम पाहणार आहेत. परंतु निवडणुकांची वास्तविक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाष बेलसरे व माजी उपकुलसचिव भारंबे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. इच्छुकांचे अर्ज मागविणे, त्यांची छाननी करणे, यादी तयार करणे इत्यादी निवडणुकींशी संबंधित कामे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार आहेत. विद्यापीठाकडून त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी कर्मचारीदेखील देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे निवृत्त होताना जितके वेतन होते,जवळपास तितकेच मानधन या कामासाठी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठात अनेक कार्यक्षम अधिकारी आहेत. अनेक सहायक उपकुलसचिवांकडे ही जबाबदारी दिली तर ते चांगल्या पद्धतीने कामदेखील करू शकतात व त्यांना अनुभवदेखील मिळू शकतो. परंतु विद्यापीठाने मात्र निवृत्त अधिकाऱ्यांकडून सेवा घेण्याचा निर्णय का घेतला याबाबत संभ्रम कायम आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांच्याशी संपर्क झाला नाही. या अधिकाऱ्यांची सेवा ही तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात येणार आहे. अगोदरच विद्यापीठात अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यात जर निवडणुकांचे पूर्णवेळ काम कोणाच्या मागे लावले तर नियमित कामांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन निवृत्त अधिकाऱ्यांची तज्ज्ञ म्हणून सेवा घेण्यात येत असल्याची माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. परंतु विद्यापीठातील रिक्त पदे का भरण्यात येत नाही, अशी विचारणा केली असता त्यांनी मौन साधले. (प्रतिनिधी)

Web Title: Belasre, the burden of weightlifting elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.