अटकपूर्व जामिनाविरुद्धची याचिका मागे

By Admin | Updated: December 2, 2015 03:27 IST2015-12-02T03:27:46+5:302015-12-02T03:27:46+5:30

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रनगर येथील बहुचर्चित कथित बलात्कार आणि जातीय अत्याचारप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपीला दिलेला अटकपूर्व जामीन आदेश रद्द व्हावा,

Behind the petition against anticipatory bail | अटकपूर्व जामिनाविरुद्धची याचिका मागे

अटकपूर्व जामिनाविरुद्धची याचिका मागे

नरेंद्रनगर येथील बहुचर्चित कथित बलात्कार प्रकरण
नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रनगर येथील बहुचर्चित कथित बलात्कार आणि जातीय अत्याचारप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपीला दिलेला अटकपूर्व जामीन आदेश रद्द व्हावा, यासाठी दाखल याचिका फेटाळल्या जाण्याच्या स्थितीत असताना फिर्यादी महिलेने परत घेतली. ही याचिका उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी यांच्या एकल पीठापुढे सुनावणीस आली होती.
डॉ. राजेंद्र श्यामराव पडोळे, असे आरोपीचे नाव आहे. पडोळे हे व्यवसायाने बिल्डर असून बहुजन समाज पार्टीचे उपाध्यक्ष आहेत.
अजनी पोलिसांनी २२ जुलै २०१५ रोजी पडोळे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३७६, ३५४ (डी) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पडोळे यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती.
फिर्यादी महिला आणि तिच्या पतीला ५५ लाखांची खंडणी दिली नाही म्हणून आपणाविरुद्ध बनावट तक्रार नोंदवून बोगस गुन्हा दाखल करण्यात आला, असे जामीन अर्जात नमूद करण्यात आले होते. खुद्द या महिलेने पोलीस ठाण्यात लिहून दिलेले निवेदन न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यात गैरसमजातून आपण पडोळे यांच्याविरुद्ध तक्रार केली, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते. विशेष न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून १ आॅगस्ट २०१५ रोजी पडोळे यांना जामीन मंजूर केला होता.
पडोळे यांचा हा जामीन आदेश रद्द करण्यात यावा, यासाठी फिर्यादी महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला. महिलेचा हा अर्ज फेटाळल्या जाण्याच्या स्थितीत असताना तो मागे घेण्यात आला. न्यायालयात याचिकाकर्त्या महिलेच्या वतीने अ‍ॅड. शशीभूषण वाहणे, सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील संजय डोईफोडे, आरोपीच्या वतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅड. सुनील मनोहर, अ‍ॅड. रजनीश व्यास आणि अ‍ॅड. लुबेश मेश्राम यांनी बाजू मांडली.
पडोळे यांनीही आपल्याविरोधातील गुन्ह्याचा प्रथम खबरी अहवाल रद्दबातल ठरवण्यात यावा, यासाठीही दाखल केलेल्या फौजदारी अर्जावर ११ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. पी.एन. देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. या अर्जात प्रतिवादी राज्य सरकारमार्फत अजनी पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने न्यायालयात उत्तर दाखल केले असून फिर्यादी महिलेने उत्तर दाखल करण्यास वेळ मागून घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Behind the petition against anticipatory bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.