कोरोनाकाळातील गुन्हे मागे ? नाही ... नाही... उलट दाखल होणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:12+5:302021-02-24T04:09:12+5:30

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गेल्यावर्षी कोरोनाकाळात विविध कारणांमुळे रस्त्यांवर आल्याने पोलिसांनी दाखल केलेल्या लाखो नागरिकांवरील गुन्हे ...

Behind the crimes of the Corona period? No ... no ... reverse filing continues | कोरोनाकाळातील गुन्हे मागे ? नाही ... नाही... उलट दाखल होणे सुरू

कोरोनाकाळातील गुन्हे मागे ? नाही ... नाही... उलट दाखल होणे सुरू

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - गेल्यावर्षी कोरोनाकाळात विविध कारणांमुळे रस्त्यांवर आल्याने पोलिसांनी दाखल केलेल्या लाखो नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा अंमलात येण्याची शक्यता धूसर झाली आहे. याउलट बेशिस्त नागरिकांवर गेल्यावर्षीसारखेच याहीवर्षी आपत्ती निवारण व्यवस्थापन तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यावरून गुन्हे दाखल केले जात आहे.

गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात विविध कारणांमुळे रस्त्यावर आलेल्या राज्यातील लाखो जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. साथरोग आपत्ती निवारण व्यवस्थापन कायदा आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून भादंविच्या कलम १८८ अन्वये (दोन प्रकारांत) हे गुन्हे दाखल झाले होते. विशेष म्हणजे, विविध अत्यावश्यक कारणांमुळे रस्त्यांवर आलेल्या नागरिकांना त्यावेळी पोलीस नाव, गाव, पत्ता विचारत होते. त्यांच्यापैकी अनेकांना कलम १८८ च्या नोटिसा मिळाल्या आहेत. त्यामुळे आपल्यावर कारवाई होईल, अशी भीती हजारो नागरिकांच्या मनात आहे. ती ध्यानात घेऊन चार आठवड्यांपूर्वी काहीजणांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत त्यांना ही माहिती दिली होती. यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी नागरिकांना पाठविलेल्या कलम १८८ च्या नोटिसा मागे घेण्याबाबत गृहविभागाच्या शीर्षस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. सकारात्मक चर्चा करून नागरिकांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असेही आश्वासन दिले होते.

यासंबंधाने गृहमंत्री देशमुख यांनी ‘कोरोनाकाळात नियम मोडणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंडविधान संहितेच्या ‘कलम १८८’ नुसार कारवाई करण्यात आली होती; परंतु त्यावेळी अनेकांना अपरिहार्यतेमुळे घराबाहेर पडावे लागले होते. त्यामुळे न्यायिक चौकटीत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येतील’ असे ट्विटही केले होते. आता त्याला चार आठवडे झाले. गृहमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे राज्यातील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला होता. त्यावेळी कोरोनाची लाट ओसरली होती. मात्र, आता राज्यात कोरोनाची नवी लाट आली आहे. त्यामुळे कोरोनाची चेन ब्रेक करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी कोणत्याच ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असेही आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक बेशिस्त नागरिक विनामास्कने घराबाहेर फिरत आहेत, ठिकठिकाणी गर्दीही करत आहेत. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आधीचे गुन्हे मागे घेतले जाणार की नाही, हा नंतरचा भाग ठरला असून सद्य:स्थितीत कोरोनाला थोपविण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी बेशिस्त नागरिकांवर पोलिसांनी पुन्हा गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे.

---

बेशिस्तांना आवरणे आवश्यक

गेल्यावर्षी नागपुरात आपत्ती व्यवस्थापनाचे २,८३५ तर कलम १८८ नुसार २११३ गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्यांतील गैरअर्जदारांची संख्या १५ हजारांवर होती. पुण्यात ही संख्या २८ हजारांवर, मुंबईत ३० हजारांवर तर राज्यात ही संख्या काही लाखांत होती, असे सूत्रांचे सांगणे आहे. गेल्या चार दिवसांत नागपुरात तीन हजार नागरिकांवर गुन्हे दाखल झालेत. कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यासाठी बेशिस्त नागरिकांना आवरणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा हा आकडा आता झपाट्याने वाढू शकतो.

---

Web Title: Behind the crimes of the Corona period? No ... no ... reverse filing continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.