Beginning of the third phase ‘Covishield’ test in Medical | मेडिकलमध्ये  तिसऱ्या टप्प्यातील ‘कोविशिल्ड’ चाचणीला सुरुवात

मेडिकलमध्ये  तिसऱ्या टप्प्यातील ‘कोविशिल्ड’ चाचणीला सुरुवात

ठळक मुद्दे २० महिला ३० पुरुषांंचा सहभाग

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीचा तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शुक्रवारपासून सुरुवात झाली. पुढील दोन दिवसात ५० व्यक्तींना ही लस दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, लस घेणाऱ्यांमध्ये २० महिला, ६० वर्षांवरील पाच ज्येष्ठ नागरिक तर १८ ते ५५ वयोगटातील २५ पुरुषांचा समावेश आहे.

‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अ‍ॅस्टॅजेनका’ कंपनीकडून‘कोविशिल्ड’ लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत. भारतात पुण्याचा ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मार्फत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. या लसीच्या मानवी चाचणीसाठी गेल्या महिन्यात नागपूर मेडिकलला परवानगी मिळाली. त्यानुसार मेडिकलने तयारी सुरू केली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात पल्मनरी मेडिसीनचे विभाग प्रमुख, कोविड हॉस्पिटल आयसीयूचे इन्चार्ज व ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात ही चाचणी होत आहे. मागील तीन दिवसापासून मानवी चाचण्यांसाठी स्वयंसेवकाची नोंदणी सुरू होती. सुमारे २०० वर लोकांनी पुढाकार घेतला. यातील १८ ते ७० वयोगटातील निरोगी व्यक्तीची निवड करून त्यांची कोविड व रक्ताची तपासणी करण्यात आली. यात सामान्य अहवाल आलेल्या ५० लोकांची निवड करून आजपासून पहिला डोज देणे सुरू झाले.

२८ व्या दिवशी दुसरा डोज

पहिला डोज दिल्यानंतर २८ दिवसांनी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी दुसरा डोज दिला जाणार आहे. त्यानंतर ५६ व्या दिवशी रक्ताची तपासणी करण्यात येईल. ९०व्या दिवशी त्यांची फोनवरून प्रकृती विषयी चौकशी केली जाईल आणि १८०व्या दिवशी त्यांची पुन्हा हॉस्पिटलमध्ये रक्ताची तपासणी केली जाईल. त्यांच्या प्रकृतीवर मेडिकलची चमू बारीक लक्ष ठेवून आहे. या चाचणीत लसीची सुरक्षितता व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता तपासली जाणार आहे.

मेडिकलमध्ये शुक्रवारपासून ‘कोविशिल्ड’चा पहिला डोज देण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसात ५० व्यक्तींना हा डोज दिला जाईल. या चाचणीसाठी स्वयंसेवकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. लस देण्यात येणाऱ्या स्वयंसेवकाच्या प्रकृतीवर डॉक्टरांची चमू लक्ष ठेवून असणार आहे.

-डॉ. सुशांत मेश्राम

प्रमुख अन्वेषक, ‘कोविशिल्ड’ चाचणी

Web Title: Beginning of the third phase ‘Covishield’ test in Medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.