गुंगारा देणाऱ्या भोंदूला १० वर्षे कारावास
By Admin | Updated: January 25, 2017 02:48 IST2017-01-25T02:48:24+5:302017-01-25T02:48:24+5:30
रेल्वे प्रवासातील ओळखीचा गैरफायदा घेत घरी पाहुणा म्हणून येऊन संपूर्ण कुटुंबाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन

गुंगारा देणाऱ्या भोंदूला १० वर्षे कारावास
रेल्वे प्रवासातील ओळखीने ओढवले होते संकट
नागपूर : रेल्वे प्रवासातील ओळखीचा गैरफायदा घेत घरी पाहुणा म्हणून येऊन संपूर्ण कुटुंबाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या एका भोंदूला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. सी. राऊत यांच्या न्यायालयाने मंगळवारी १० वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दीपक कन्हैयालाल सरवय्या ऊर्फ डॉ. दीपक शाहू (६२), असे आरोपीचे नाव असून तो यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील नवीन चिचोली येथील रहिवासी आहे.
प्रकरण असे, सिव्हिल लाईन्स रिझर्व्ह बँक क्वॉर्टर येथील रहिवासी दिनेश नृपती शाहू हे आपल्या कुटुंबासह १३ सप्टेंबर २०१४ रोजी जबलपूर एक्स्प्रेसने अमरावतीहून नागपूरला परतत असताना त्यांची शेजारच्या बर्थवर बसलेल्या या भोंदूसोबत ओळख झाली होती. त्याने स्वत:चे नाव दीपक शाहू असल्याचे आणि आयुर्वेद डॉक्टर असल्याचे तसेच नागपुरात अधूनमधून येणे होत असल्याचे सांगितले होते. आपण एकाच समाजाचे आहोत, असेही त्याने सांगितले होते. त्याला दिनेश शाहू यांनी नागपुरात येणे झाल्यास घरी येण्याचे निमंत्रणच देऊन टाकले होते.
२१ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास हा भोंदू रिझर्व्ह बँक क्वॉर्टर येथील दिनेश शाहू यांच्या घरी पाहुणा म्हणून गेला होता. त्यावेळी ते रात्रपाळी ड्युटीसाठी गेले होते. दिनेशची पत्नी निशा हिने आपल्या पतीला मोबाईलवर या पाहुण्याबाबत सांगितले असता त्यांनी या पाहुण्याला जेवण देण्यास सांगितले होते. जेवणापूर्वी या भोंदूने निशा, दोन मुले आणि भाच्याला बुंदीच्या लाडूचा प्रसाद खाण्यास दिला होता. त्यानंतर सर्वांनी जेवण केले होते. हळूहळू गुंगी येऊन निशा आणि लहान मुले बेशुद्ध झाले होते. गैरफायदा घेत भोंदूने घरातील ३ लाख ३८ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा शाहू शुद्धीवर आली असता तिला तिचे संपूर्ण घर साफ झालेले दिसले होते.
या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोंदूला अमरावती भागात अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक आर. जे. बांदेकर यांनी तपास करून आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सात साक्षीदार तपासण्यात आले. (प्रतिनिधी)
दोन्ही गुन्ह्यात सुनावली शिक्षा
न्यायालयाने गुन्हा सिद्ध होऊन या भोंदूला भादंविच्या ३२८ कलमांतर्गत १० वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि ३८० कलमांतर्गत ७ वर्षे कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील वर्षा आगलावे, नितीन देशमुख तर आरोपीच्या वतीने अॅड. निशा गजभिये यांनी काम पाहिले. नायक पोलीस रवींद्र धरपाल, हेड कॉन्स्टेबल रविकिरण भास्करवार यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.