बीअरबार, शॉपीचा परवाना मागणाऱ्यांना पोलिसांचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:09 IST2020-12-24T04:09:27+5:302020-12-24T04:09:27+5:30
जगदीश जोशी नागपूर : पोलीस आयुक्तांनी दारूच्या व्यापाऱ्यांना नवीन वर्षापूर्वीच झटका दिला आहे. बीअरबार, शॉपी सुरू करण्यास इच्छुक २३ ...

बीअरबार, शॉपीचा परवाना मागणाऱ्यांना पोलिसांचा झटका
जगदीश जोशी
नागपूर : पोलीस आयुक्तांनी दारूच्या व्यापाऱ्यांना नवीन वर्षापूर्वीच झटका दिला आहे. बीअरबार, शॉपी सुरू करण्यास इच्छुक २३ व्यापाऱ्यांचे अर्ज रद्द केले आहेत. शहरात पहिल्यांदा पोलीस आयुक्तांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी असे पाऊल उचलले आहे. व्यापाऱ्यांचे अर्ज रद्द करण्याबरोबरच आयुक्तांनी बुधवारी रात्री दारूविक्रेत्यांना नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याची ताकीद दिली आहे. पोलीस आयुक्तांच्या या भूमिकेमुळे दारूच्या व्यवसायातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहरात दारूची ७०० दुकाने आहेत. महसूल वाढण्याबरोबरच गुन्ह्यांचा ग्राफ वाढण्यातही दारूच्या दुकानांची महत्त्वाची भूमिका आहे. अवैध दारूचे अड्डे नेहमीच गुन्हेगारांचे आश्रयस्थान ठरले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच अवैध दारूच्या अड्ड्यांवर कारवाई केली. देशी दारू व वाईन शॉपसाठी नवीन परवाने देणे बंद आहे. त्यामुळे बीअरबार व बीअर शॉपीसाठी नवीन परवाने दिले जात आहेत. दरवर्षी बीअरबार व बीअर शॉपीसाठी २५ ते ३० अर्ज पोलीस आयुक्तांकडे येतात. पोलीस विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच उत्पादन शुल्क विभागामार्फत परवाने दिले जातात. दारूमुळे सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे बहुतांश अर्जांना एनओसी मिळून जाते. स्थानिक नागरिकांचा विरोध, कायदा व सुव्यवस्था तसेच पार्किंगचा अभाव यामुळे काही अर्ज रद्द होतात. यावर्षी २३ अर्ज पोलिसांकडे आले. पोलीस आयुक्तांनी अर्जदारांना सांगितले की, कायदा व सुव्यवस्था व वाहतुकीच्या कारणाने अर्ज रद्द करण्यात येत आहे.
त्याचबरोबर बुधवारी रात्री वाईन शॉप, देशी दारूचे दुकान व बीअर शॉपी व बार संचालकांची बैठक घेतली. त्यांना आयुक्तांनी ताकीद दिली की, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. ठरवून दिलेल्या वेळेनंतर कुठलीही दारूची दुकान सुरू राहणार नाही. ज्या व्यापाऱ्यांकडून त्याचे उल्लंघन होईल, त्यांच्यावर कारवाई होईल. आयुक्तांनी स्पष्ट केले की दारूच्या तस्करीत व्यापारी आढळल्यास, त्याला अटक करून परवाना रद्द करण्यात येईल. दरवर्षी नवीन वर्षात दारूची विक्री वाढते, त्यावर पोलीस आयुक्तांची नजर राहणार आहे. शहरात नाईट कर्फ्यूचे कडक पालन केले जाणार आहे.