बेड रिकामे, रुग्णसंख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:33+5:302021-05-25T04:09:33+5:30
उमरेड : कोरोना रुग्णांना बेडच मिळत नसल्याच्या घटनांनी मागचा महिना दणाणला होता. मे महिन्याच्या प्रारंभापासून परिस्थिती थोडी आटोक्यात आली. ...

बेड रिकामे, रुग्णसंख्येत घट
उमरेड : कोरोना रुग्णांना बेडच मिळत नसल्याच्या घटनांनी मागचा महिना दणाणला होता. मे महिन्याच्या प्रारंभापासून परिस्थिती थोडी आटोक्यात आली. त्यात आता आठवडाभरापासून अनेकांना जरासा दिलासा मिळाला आहे. उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये बेड रिकामे आणि रुग्णसंख्येत कमालीची घट यामुळे समाधानकारक प्रतिक्रिया उमटत आहे. सध्या ८० बेडच्या या कोविड सेंटरमध्ये केवळ ९ जणांवर औषधोपचार सुरू आहेत. सध्या परिस्थिती चांगलीच आटोक्यात असल्याचे मत रात्रंदिवस एक करीत सेवाकार्य करणाऱ्या डॉक्टरांचे आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोना चाचणीची संख्या रोडावली आहे. यामुळे कोरोनाबाधितांची आकडेवारीसुद्धा फारच कमी येत आहे. सोमवारी तालुक्यात केवळ ४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. हा मागील अनेक महिन्यांपासूनचा निच्चांक मानला जातो. यामध्ये शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे.
कोविड सेंटरच्या प्रमुख डॉ. सुनीता निंबार्ते तसेच डॉ. निवेदिता निशाने यांच्याशी चर्चा केली असता, परिस्थिती आटोक्यात असली तरी कुणीही अतिआत्मविश्वास बाळगू नये, असे स्पष्ट केले. ‘म्युकरमायकोसिस’ याबाबतचे रुग्ण सध्या परिसरात नाहीत. तरीही आहार संतुलन, नियमित व्यायाम, स्वच्छता, नियमित तपासणी आदी बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
-----
पूर्वतयारी आणि नियोजन
कोरोनाची लाट ओसरली म्हणून कुणीही दुर्लक्षित करू नये. शिवाय या कालावधीत आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि बळकट कशी करता येईल, याकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जाणिवेने लक्ष द्यावे. दरम्यान, पुढील परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी आणि नियोजन आखणे गरजेचे असल्याचे मत सुभाष देवाळकर, अॅड. विजय खवास यांनी व्यक्त केले.
-
साहित्य पुरेसे आहे
उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये विविध संस्थांनी पुढाकार घेतला. या संस्थांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दिलदारपणामुळेच हे सेंटर ठिकाण्यावर आले. सध्या कोविड सेंटरमध्ये ३३ मोठे ऑक्सिजन सिलिंडर, लहान ऑक्सिजन सिलिंडर २७, ऑक्जिन कॉन्सेंट्रेकर मशीन ६ तसेच ४ बायपॅक मशीन आदी पुरेसे साहित्य उपलब्ध आहे.
-----
कोविड सेंटरला ज्या सेवाभावी संस्थेने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला. त्या साहित्यांची-वस्तूंची विशेष काळजी आरोग्य विभागाने घ्यावी. त्याचे ऑडिट होणेही महत्त्वाचे आहे. ही महागडी उपकरणे धूळ खात राहू नये, एवढीची इच्छा आहे.
प्रमोद घरडे
संस्थापक, मातोश्री प्रभादेवी सेवा संस्था.