जातीचे नव्हे विचारांचे वारस व्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:54 IST2018-03-09T22:53:58+5:302018-03-09T22:54:10+5:30
महापुरुषांच्या विचारांना जातीपुरते मर्यादित करण्याची वाईट सवय आपल्या देशात आहे. एका अस्पृश्याने या देशाचे संविधान लिहिल्यामुळे संविधानालाही विरोध झाला, अशी मानसिकता आहे. तेव्हा महापुरुषांना जातीत बंदिस्त करू नका. त्यांच्या जातीचे वारस होण्याऐवजी विचारांचे वारस व्हा. त्याशिवाय महापुरुषांचे विचार समजू शकणार नाही, असे प्रतिपादन मराठी समाजशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश वाघमारे यांनी येथे केले.

जातीचे नव्हे विचारांचे वारस व्हा !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापुरुषांच्या विचारांना जातीपुरते मर्यादित करण्याची वाईट सवय आपल्या देशात आहे. एका अस्पृश्याने या देशाचे संविधान लिहिल्यामुळे संविधानालाही विरोध झाला, अशी मानसिकता आहे. तेव्हा महापुरुषांना जातीत बंदिस्त करू नका. त्यांच्या जातीचे वारस होण्याऐवजी विचारांचे वारस व्हा. त्याशिवाय महापुरुषांचे विचार समजू शकणार नाही, असे प्रतिपादन मराठी समाजशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश वाघमारे यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दीक्षांत सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘डॉ. आंबेडकरांचा सामाजिक पुनर्रचनेचा दृष्टिकोन आणि सद्यस्थिती’ याविषयावर ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम, उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण प्रामुख्याने उपस्थित होते.
ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातविरहित समाजरचनेवर भर दिला होता. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आपण आजही जातीतच जगतो आणि जातीतच मरतो जातविरहित समाजरचना आपण निर्माण करू शकलो नाही. कारण महापुरुषांचे विचार न पाहता आपण त्याची जात पाहत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका देशापुरते किंवा समाजापुरते मर्यादित नाहीत. तर ते समस्त मानव कल्याणाचा विचार आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे दुर्लक्षित करता येणार नाही किंवा त्याला नाकारताही येणार नाही. देशाला व जगाला प्रकाशित करण्याचा हा विचार आहे, तेव्हा राष्ट्रनिर्माणासाठी जातीभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे न्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी युवा स्पंदनमध्ये पुरस्कार मिळविणाऱ्या दिलीप गायकवाड, सुप्रिया वालदे आणि वैभव ओगले या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले. संचालन डॉ. रमेश शंभरकर यांनी केले. प्रा. शैलेश धोंगडे यांनी आभार मानले.
समतेला शह देण्यासाठीच समरसता
शोषितांचा वर्गच असू नये हीच खरी समता होय. समतेचा हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला. स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या माध्यमातून तो रुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु या समतेला शह देण्यासाठी समरसता पुढे केली जाते. देशात समता प्रस्थापित होऊ नये यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचेही डॉ. वाघमारे यांनी स्पष्ट केले.