मेडिकलच्या ब्रदर्सला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST2021-08-12T04:12:09+5:302021-08-12T04:12:09+5:30
नागपूर : शस्त्रक्रियागृहाच्या आत जाताना हटकले का म्हणून एका इसमाने ब्रदर्सला मारहाण केल्याच्या घटनेने मंगळवारी सायंकाळी मेडिकलमध्ये खळबळ उडाली. ...

मेडिकलच्या ब्रदर्सला मारहाण
नागपूर : शस्त्रक्रियागृहाच्या आत जाताना हटकले का म्हणून एका इसमाने ब्रदर्सला मारहाण केल्याच्या घटनेने मंगळवारी सायंकाळी मेडिकलमध्ये खळबळ उडाली. इसमाच्या विरोधात अजनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्यानंतर, परिचारिकांनी काही तासासाठी पुकारलेला संप रात्री १० वाजता मागे घेतला.
सलमान पठाण (२८) असे त्या मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव. प्राप्त माहितीनुसार, अस्थिव्यंगोपचार विभागाच्या शस्त्रक्रियागृह ‘ई’मध्ये एका रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेसाठी लागणारे ‘इम्प्लांट’ ‘एक्सीकेअर’ या कंपनीने दिले होते. या कंपनीचा कर्मचारी सलमान पठाण शस्त्रक्रियेनंतर उरलेले ‘इम्प्लांट’ घेऊन जाण्यासाठी शस्त्रक्रियागृहात जात असताना विभागातील ब्रदरने त्याला थांबविले. येथे बाहेरच्यांना येण्यास सक्त मनाई असल्याचे सांगितले. यावर दोघांमध्ये वाद झाला. पठाणने ब्रदरच्या गालावर थापड मारून पोटावर बुक्की मारली. ब्रदर तिथेच खाली कोसळला. या प्रकाराने आजूबाजूचे डॉक्टर, परिचारिका धावल्या. तोपर्यंत पठाण तेथून निघून गेला. याविरोधात सर्व परिचरिका अधिष्ठात्यांकडे गेल्या. जोपर्यंत मारहाण करणाऱ्या इसमाला अटक होत नाही तोपर्यंत कामावर कुणी जाणार नाही, अशी भूमिका घेतली. रात्री ९ वाजताच्या दरम्यान मेडिकल प्रशासनाने अजनी पोलीस ठाण्यात पठाणच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सर्व परिचारिका आपल्या कामावर परतल्या.