आवडीच्या क्षेत्रात संघर्षासाठी तयार राहा!
By Admin | Updated: June 27, 2014 00:45 IST2014-06-27T00:45:11+5:302014-06-27T00:45:11+5:30
तो आला...आणि एकच जल्लोष झाला. त्याला पाहण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी सारेच उत्सुक होते. सभागृहात येताक्षणीच त्याने सर्व युवा नेक्स्ट सदस्यांना दोन्ही हात दाखवून प्रतिसाद दिला

आवडीच्या क्षेत्रात संघर्षासाठी तयार राहा!
अभिनेता रितेश देशमुखचा लोकमत युवा नेक्स्ट सदस्यांना मंत्र : परिश्रमाशिवाय कुठेच यश नाही
नागपूर : तो आला...आणि एकच जल्लोष झाला. त्याला पाहण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी सारेच उत्सुक होते. सभागृहात येताक्षणीच त्याने सर्व युवा नेक्स्ट सदस्यांना दोन्ही हात दाखवून प्रतिसाद दिला आणि रितेश...रितेश म्हणत युवक-युवतींनी त्याला साद घातली. जल्लोषात झालेले स्वागत अनुभवताना तो भारावला. लोकमत परिवारातर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि अभियानाची त्याने तोंडभरून स्तुती केली आणि युवक - युवतींशी संवाद साधताना शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता आवडीच्या क्षेत्रात संघर्ष करण्याची जिद्द बाळगा. यश तुमच्या पायाशी लोळण घेईल, अशा शुभेच्छा दिल्यात.
लोकमत युवा नेक्स्टच्यावतीने युवा नेक्स्टच्या सदस्यांसाठी अभिनेता रितेश देशमुखसह संवाद आणि धम्माल मस्तीचा कार्यक्रम हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी रितेशने त्याच्या आगामी ‘एक व्हीलन’ चित्रपटाबाबत माहिती देतानाच आपला सिनेसृष्टीतील प्रवास मनमोकळेपणाने उलगडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हॉटेल सेंटर पॉईंटचे सर्वेसर्वा अंगद अरोरा उपस्थित होते. लोकमतच्यावतीने नागपूर युनिट महाव्यवस्थापक नीलेशसिंग यांनी रितेश देशमुख यांचे स्वागत केले. याप्रसंगी युवा नेक्स्टच्या सदस्यांनी प्रचंद गर्दी केली होती.
याप्रसंगी रितेश म्हणाला, मला येथे उपस्थित राहता आले, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आपण केलेले स्वागत आणि मला दिलेली भेट माझ्या घराच्या भिंतीवर मी नेहमीसाठी ठेवेन. लोकमत परिवाराने ‘ली’ ही वाघिण दत्तक घेतली होती. तिचा पगमार्क रितेशला यावेळी भेट म्हणून देण्यात आला. सध्या सामाजिक भान जपण्याची नितांत गरज आहे. एखाद्या प्राण्याचा खर्च एखाद्या संस्थेने उचलणे, ही कमालीची संवेदनशीलता लोकमतने दाखविल्याबद्दल रितेशने लोकमतची प्रशंसा केली. याशिवाय सध्या देशात कन्या भ्रूणहत्या थांबविणे, हा मुद्दा ऐरणीवर आहे. हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. मुलीचा जन्म होणे म्हणजेच घरात लक्ष्मी येणे. त्या लक्ष्मीचा आदर आपण करायला हवा. प्रत्येक स्त्री मध्ये आपल्याला आई आणि बहीण दिसायला हवी पण यातून प्रेयसीला मात्र वगळले पाहिजे. (हशां)
खरा मर्द तोच आहे, जो स्त्रियांचा आदर करतो. त्याच्या या वाक्यावर सर्वांनीच टाळ्या वाजवून दाद दिली. तब्बल तासभर रितेशच्या उपस्थितीने आणि त्याच्याशी संवादाने वातावरणात उत्साह भारला होता. याप्रसंगी युवक-युवतींनी त्याच्यासह नृत्य करण्याचा आनंद घेतला.
‘एक व्हीलन’ या चित्रपटात मी अत्यंत वेगळी भूमिका केली आहे. शोले सिनेमाच्या गब्बरसिंगची प्रेमकथा असली तर कसे वाटेल, तशीच या चित्रपटाची कथा आहे. यात व्हीलन असणारा प्रेमी आणि त्याची प्रेयसी यांचे दोन स्थितीतले द्वंद्व आणि त्यांची मानसिक, भावनिक आंदोलने मोठ्या कौशल्याने मांडण्यात आली आहे. हा व्हीलन जवळपास प्रत्येकात असतो पण आपले संस्कार आणि आपल्या शिक्षणाने आपल्यातला चांगुलपणा वाढतो. तो आपल्यातल्या वाईटावर मात करतो. त्यामुळे हा चित्रपट पाहताना प्रत्येकाला ही कथा रिलेट करेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. माझ्या घरात चित्रपट क्षेत्रात कुणीही नव्हते. घरात शिक्षणाचा संस्कार होता. शिक्षण घेताना चित्रपटात भूमिका करण्याचा विचारही मी केला नव्हता.
आज माझ्या वडिलांची विलासराव देशमुख यांची खूप आठवण येते. काहीही करायचे असले तरी आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे, हा त्यांचा उपदेश होता. ते राजकारणात मुख्यमंत्री पदापर्यंत गेले पण त्यांनी विज्ञान आणि कला शाखेत पदवी घेतली होती. त्यानंतर मी देखील आर्किटेक्ट आहे. माझा भाऊ रासायनिक अभियंता आणि एक भावाने एमबीए केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यावर मी अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले आणि संघर्ष केला. आज गेले १२ वर्षे मी या क्षेत्रात आहे. वडील मुख्यमंत्री होते म्हणून मला संधी मिळाली नाही तर मी माझ्या भरवशावर हे यश मिळविले आहे. ‘एक व्हीलन’ या चित्रपटात प्रथमच मी नकारात्मक भूमिका केली आहे. ही भूमिका सर्वांनाच आवडेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. याप्रसंगी युवा नेक्स्ट सदस्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले आणि त्यानेही मनमोकळी उत्तरे देऊन आपला प्रवास उकलला. (प्रतिनिधी)