मागणारे होण्यापेक्षा देणारे व्हा

By Admin | Updated: October 26, 2016 03:01 IST2016-10-26T03:01:25+5:302016-10-26T03:01:25+5:30

नागपूर महापालिकेने मंजूर केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक मागील २५ वर्षांपासून रखडलेले आहे.

Be the one to give up | मागणारे होण्यापेक्षा देणारे व्हा

मागणारे होण्यापेक्षा देणारे व्हा

वीरसिंह यांचे आवाहन : बसपा संघटन आढावा सभा
नागपूर : नागपूर महापालिकेने मंजूर केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक मागील २५ वर्षांपासून रखडलेले आहे. त्याचे कामही सुरू होऊ शकलेले नाही. यासाठी कॉँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकमेव पक्ष हा बसपा असून बसपाला साथ द्या. मागणारे होण्यापेक्षा देणारे बना, बसपाचा महापौर बनवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मशताब्दी स्मारक स्वत: तयार करून घ्या, असे आवाहन बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी खा. वीरसिंह यांनी येथे केले.
बहुजन समाज पार्टीतर्फे विदर्भ हिंदी साहित्य संघ सीताबर्डी येथे आयोजित बसपा संघटन आढावा सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रभारी प्रेम रोडेकर, जितेंद्र म्हैसकर, प्रदेश सचिव सागर डबरासे, उत्तम शेवडे, विश्वास राऊत, डॉ. राजेंद्र पडोळे, विवेक हाडके, पृथ्वीराज शेंडे, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, मनपा गटनेते गौतम पाटील, रूपेश बागेश्वर, मिलिंद बन्सोड, संजय जैस्वाल, महेश सहारे, कविता लांडगे प्रामुख्याने उपस्थित होते.
उत्तर प्रदेशात बसपाची सत्ता आली तेव्हा देशातील अनेक महापुरुषांची स्मारके तयार करण्यात आली. याची आठवण करून देत नागपूर महापालिकेतही बसपाची सत्ता आणा तेव्हा तुम्हाला कुणाला मागण्याची गरज पडणार नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष सारखेच असून ते भांडवलदार व उद्योगपतींचे हित जोपासणारे पक्ष आहेत, त्यांच्याकडून गरीब दीन, दलित शोषितांना न्याय मिळू शकत नाही, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे सोडून द्या, असेही ते म्हणाले.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बसपात प्रवेश केला. (प्रतिनिधी)

अ‍ॅट्रॉसिटी कायदा आणखी कडक व्हावा
बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यावेळी म्हणाले अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा शिथिल न करता तो आणखी कडक करण्यात यावा. बसपा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. परंतु इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मनपा निवडणुका लक्षात घेता त्यांनी बसपा कार्यकर्त्यांना कामाला लागा असे निर्देश देत महापौर बनाओ अभियान चालवण्याचे आदेश दिले.

Web Title: Be the one to give up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.