म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचारासाठी अधिक सजग राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:27+5:302021-05-23T04:07:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनावर उपचार सुरू असताना म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढल्याने या आजारावर उपचार करण्यासाठी ...

म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचारासाठी अधिक सजग राहा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनावर उपचार सुरू असताना म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढल्याने या आजारावर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासन त्याचबरोबर आरोग्य सेवांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता असून, पहिल्या टप्प्यामध्ये या आजारावर उपचार करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी दिले.
कोरोनाच्या संदर्भात शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व कोरोना टास्क फोर्सचे अधिकारी उपस्थित होते.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची एकूण संख्या व त्या रुग्णांवर होत असलेल्या उपचाराचा राऊत यांनी बैठकीत सविस्तर आढावा घेतला. या रोगाबद्दल लोकांमध्ये व विशेषतः ग्रामीण भागात जनजागृती करावी यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांची मदत घ्यावी.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मदत करता येईल काय? यासंदर्भातही जिल्हा प्रशासनाने पाहावे, या रुग्णांवर तात्काळ शस्त्रक्रियेची गरज पडते. या योजनेतून ही रक्कम खर्च करता येईल, यामुळे रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होईल. खासगी डॉक्टरांनीसुद्धा या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची शस्त्रक्रियापूर्व संमती घ्यावी व या रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत, असे निर्देश दिले.
या रोगाची लक्षणे काय आहेत? यासंदर्भात काही फ्लेक्स तयार करून गावोगावी लावावे, म्हणजे लोकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता निर्माण होईल, अशी सूचनाही केली.